सांगवी काटी (तालुका तुळजापूर) येथील धर्मप्रेमींच्या पुढाकाराने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे यशस्वी आयोजन !
सांगवी काटी (तुळजापूर) – सध्या सर्वत्रच हिंदूंवरील आघातांचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशातील परिस्थितीवरून आपल्याला त्याचा अंदाज आला आहे. भारतातील जिहादी आतंकवादी हिंदू आणि मंदिरे यांवर आक्रमणे करत आहेत, तर दुसरीकडे अर्बन नक्षलवादी हिंदूंचा बुद्धीभेद करून भ्रमित करत आहेत. धर्माचरण केल्यामुळे हिंदूंचे कुटुंब आणि राष्ट्र यांचे रक्षण होणार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी केले. १० डिसेंबर २०२४ या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील सांगवी काटी (तालुका तुळजापूर) गावातील साळुंके पाटील फंक्शन हॉल, मुक्तीनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर सरपंच श्री. अमोल पाटील हेही उपस्थित होते. श्री. पाटील यांनी शेवटी आभारप्रदर्शन केले, तर सूत्रसंचालन समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी केले. येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींनी प्रतिदिनची त्यांची वैयक्तिक कामे आटोपून उर्वरित वेळेत आसपासच्या १३ गावांमध्ये या सभेचा स्वत:हून प्रसार केला. धर्मप्रेमींनी केलेल्या या प्रसाराला यश मिळून सभेला ४५० हून अधिक हिंदू उपस्थित राहिले.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात प्रशासनाला निवेदन !
सभेनंतर लगेचच कृतीशील होत १२ डिसेंबर २०२४ या दिवशी धर्मप्रेमींनी बांगलादेशातील चिन्मय कृष्णदास प्रभु यांच्या अन्याय्य अटकेच्या विरोधात त्वरित हस्तक्षेप करावा आणि अल्पसंख्यांक हिंदूंवरील अन्याय रोखण्यात यावा, या मागणीचे निवेदन तुळजापूर येथील तहसीलदार मयुरा पेरे यांना दिले. या वेळी सर्वश्री भगवंत माने, विशाल मगर, सूरज अक्कलकोटे, आदेश मेंगले, खंडू तोडकर, सतीश कुंचपोर, सुरेश नाईकवाडी, संदीप बगडी, उमेश कदम आदी उपस्थित होते.