|
मुंबई – प्रत्येक महिलेचे वैयक्तिक जीवन आहे. त्यामुळे तिने कुणासह रहायचे किंवा राहू नये, हे ठरवण्याचा आणि तिच्या इच्छेनुसार जगण्याचा तिला अधिकार आहे, अशी स्पष्टोक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपिठाने २० वर्षांच्या मुसलमान प्रियकरासह ‘लिव्ह इन’मध्ये (विवाह न करता मुलगा-मुलगी यांनी एकत्र रहाणे) रहाणार्या हिंदु तरुणीच्या निमित्ताने केली. याच्या जोडीलाच न्यायालयाने तिचा ताबा तिच्या ‘लिव्ह-इन’मधील जोडीदाराला देण्यासही न्यायालयाने नकार दिला.
न्यायालयाने म्हटले की, ‘ही तरुणी भावनिकदृष्ट्या प्रभावित झाली असून त्याच प्रभावाखाली वागत आहे’, असे तरुणीच्या पालकांचे म्हणणे आहे. आम्ही तिला पालकांकडे जाण्यास सांगितले होते. तिला आणखी एक वर्ष आई-वडिलांसह रहाण्याचा सल्लाही दिला होता; पण ती पालकांसह जाण्यास सिद्ध नव्हती. तिला तिच्या कल्याणाची जाणीव आहे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक निर्णयात हस्तक्षेप करता येत नाही.
तरुणीला तिचे पालक आणि बजरंग दलाच्या सदस्यांसह इतरांच्या तक्रारींनंतर बळजोरीने निवारागृहात ठेवण्यात आल्याचे प्रियकराने म्हटले होते. तिची तेथून सुटका करण्याच्या मागणीसाठी त्याने न्यायालयात धाव घेतली होती. ‘तिचा माझ्या समवेत रहाण्याचा निर्णय जाणीवपूर्वक आणि कोणतीही बळजोरी, प्रभाव किंवा दबाव यांविना होता’, असेही त्याने याचिकेत म्हटले होते.