‘महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम १९५०’चे कलम १८ प्रमाणे सार्वजनिक न्यासाच्या नोंदणीसाठी अर्ज प्रविष्ट (दाखल) करणे, हे विश्वस्तांचे उत्तरदायित्व आहे. हा अर्ज न्यासाचे कार्यालय, न्यासाची मिळकत किंवा मिळकतीचा मोठा भाग ज्या ठिकाणी आहे त्या जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रविष्ट करावा लागतो. हा अर्ज लेखी स्वरूपात आणि विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक असते. हा अर्ज न्यासाची स्थापना झाल्यापासून ३ मासांत प्रविष्ट करणे आवश्यक असते.
१. सार्वजनिक न्यासाच्या नोंदणीत समाविष्ट करावयाची सूत्रे या अर्जामध्ये खालील सूत्रे नमूद करणे आवश्यक असते.
अ. विश्वस्तांची नावे आणि त्यांचे पत्ते
आ. विश्वस्त पालटण्याची रित (पद्धत)
इ. न्यासाच्या चल आणि अचल संपत्तीची सूची
ई. सदर चल, अचल संपत्तीची किंमत
उ. सदर मिळकतीमधून मागील ३ वर्षांत किंवा न्यासाची स्थापना झालेल्या दिनांकापासून मिळालेले उत्पन्न
ऊ. मागील ३ वर्षांत किंवा न्यासाच्या स्थापनेपासून न्यासासाठी झालेला व्यय
ए. पत्रव्यवहारासाठी न्यासाचा पत्ता
ऐ. ज्या कागदपत्रांच्या आधारे न्यासाची स्थापना झालेली आहे त्याची माहिती
ओ. न्यासाचा हेतू
औ. न्यासाचे उत्पन्नाचा स्रोत
अं. न्यासाच्या मिळकतीवर जर बोजा असेल, तर त्याची माहिती
क. न्यासाची नियमावली
ख. न्यासाच्या मिळकतीच्या मालकी हक्काची कागदपत्रे आणि सदर मिळकत ज्या विश्वस्तांच्या कह्यात आहे त्यांची नावे
२. न्यासाच्या नोंदणीसंबंधाने होणारी प्रक्रिया
न्यासाच्या नोंदणीसाठी ज्या विश्वस्ताला किंवा प्रतिनिधीला प्राधिकृत केलेले आहे, त्याची सदर अर्जावर स्वाक्षरी आणि सत्यापन (व्हेरिफिकेशन) असणे आवश्यक असते. सदर अर्जासमवेत न्यासासाठी सिद्ध केलेल्या नियमावलीची प्रत जोडणे आवश्यक असते. यासह या अर्जासमवेत नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या शुल्काची रक्कम जमा करावी लागते.
न्यासाच्या नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून त्या अर्जाची पडताळणी केली जाते. त्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा आवश्यक ती माहिती नसेल किंवा अपूर्ण असेल, तर तो अर्ज त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती माहिती देण्यासाठी विश्वस्तांकडे परत केला जातो. अर्जात त्रुटी नसेल, आवश्यक ती माहिती दिलेली असेल, तर तो अर्ज पुढील चौकशीसाठी साहाय्यक/ उपधर्मादाय आयुक्त यांच्याकडे पाठवला जातो.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर साहाय्यक/ उपधर्मादाय आयुक्त अर्जातील माहितीच्या सत्यतेविषयी चौकशी करतात, कागदपत्रांची पडताळणी करतात. त्याचप्रमाणे सदर न्यासाच्या नोंदणीसाठी कुणाचा आक्षेप असेल, तर तो प्रविष्ट करून घेण्यासाठी ‘जाहीर प्रकरण’ प्रसारित करतात. नोंदणीसाठी कुणाचाही आक्षेप नसेल, तर चौकशी पूर्ण करून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. आक्षेप असेल, तर अर्जदार आणि आक्षेपक यांचे म्हणणे ऐकून नोंदणी करतात किंवा नोंदणीसाठी आलेला अर्ज नामंजूर (अमान्य) करतात. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर न्यासाची नोंद विहित नमुन्यातील वहीत केली जाते आणि अर्जदारास विहित नमुन्यातील नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.
नोंदणी करणे किंवा ती नाकारणे, या दोन्ही आदेशांवर अप्रसन्न असल्यास सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे अपील प्रविष्ट करता येते.’
– श्री. दिलीप मा. देशमुख, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त, पुणे. (८.१२.२०२४)
धर्मादाय संस्था आणि मंदिर विश्वस्त यांच्यासाठी सूचनादैनिक ‘सनातन प्रभात’मधून सार्वजनिक न्यासाच्या अनुषंगाने ही लेखमाला प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही लेखमाला वाचून वा सार्वजनिक न्यासाच्या अनुषंगाने काही शंका किंवा प्रश्न असतील, तर या चौकटीत दिलेला ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन करून त्यावर शंका पाठवाव्यात. – संपादक |