पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्‍वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्‍त्रीय संगीत पुरस्‍कार’ प्रदान !

पू. पंडित गिंडे यांना सन्‍मानपत्र देऊन सत्‍कार करतांना डावीकडून दयानंद घोटकर, अविनाश धर्माधिकारी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे, पू. पंडित केशव गिंडे, रवींद्र दुर्वे आणि शारंग नातू

पुणे, २० सप्‍टेंबर (वार्ता.) – ‘गानवर्धन संस्‍था पुणे’ आणि ‘तात्‍यासाहेब नातू फाऊंडेशन’ यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ बासरीवादक, संशोधक आणि विचारवंत पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्‍वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्‍त्रीय संगीत पुरस्‍कार’ प्रदान करण्‍यात आला. गानवर्धन संस्‍था, पुणे ही हिंदुस्‍थानी शास्‍त्रीय संगीताच्‍या प्रचार आणि प्रसार यांसाठी गेली ४४ वर्षे सातत्‍याने कार्य करत आहे. वर्ष २०१० पासून हिंदुस्‍थानी शास्‍त्रीय संगीतात भरीव योगदान देणार्‍या कलाकारांना हा पुरस्‍कार देण्‍यात येतो. पद्मविभूषण स्‍वरयोगिनी डॉ. प्रभाताई अत्रे यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. शाल, श्रीफळ, सन्‍मानपत्र आणि ५० सहस्र रुपये, असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे. गानवर्धनच्‍या कोषाध्‍यक्षा सविता हर्षे यांनी मानपत्राचे वाचन केले. नुकतेच पू. पंडित गिंडे यांना ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’च्‍या वतीने ‘महामहोपाध्‍याय’ या पदवीने सन्‍मानित केले आहे.

सत्‍काराला उत्तर देतांना महामहोपाध्‍याय पू. पंडित केशव गिंडे म्‍हणाले, ‘‘पद्मविभूषण प्रभाताई अत्रे यांनी अनेक दिग्‍गज गायकांच्‍या गायकीचा एकलव्‍याप्रमाणे अभ्‍यास करून किराणा घराण्‍यात आपली ‘प्रभा अत्रे शैली’ निर्माण केली आहे. त्‍यांच्‍या नावाचा पुरस्‍कार त्‍यांच्‍या हस्‍ते प्राप्‍त होणे, हे मी माझे महद़्‍भाग्‍य मानतो. आजच्‍या या पुरस्‍काराची रक्‍कम मी संगीतासाठी कार्यरत असणार्‍या ‘अमूल्‍य ज्‍योती’ या संस्‍थेला अर्पण करतो.’’

या वेळी ‘चाणक्‍य मंडळ’चे अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते. पू. पंडित गिंडे यांच्‍याविषयी गौरवोद़्‍गार काढतांना धर्माधिकारी म्‍हणाले, ‘‘पू. गिंडे यांच्‍या बासरीवादनात मला भगवान श्रीकृष्‍णाची बासरी ऐकू येते. पद्मविभूषण प्रभाताई अत्रे या स्‍वरयोगिनी आणि उत्तम रचनाकार आहेत. त्‍यांच्‍या स्‍वर आणि शब्‍द यांमध्‍ये चिंब भिजायला होते. या दोन महान तपस्‍वींचा आशीर्वाद घेण्‍याचे भाग्‍य मला लाभले.’’

‘तात्‍यासाहेब नातू फाऊंडेशन’चे श्री. शारंग नातू, गानवर्धनचे दयानंद घोटकर आणि सचिव रवींद्र दुर्वे उपस्‍थित होते.

पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे म्‍हणाल्‍या, ‘‘शिक्षणात भारतीय संस्‍कृती आणि अभिजात संगीत याचा अंतर्भाव असावा. यामुळे चांगले कलाकार आणि संवेदनशील पिढी निर्माण होण्‍यास साहाय्‍य होईल. रसिकांचे प्रेम मला पुढील वाटचाल करण्‍यास सतत प्रोत्‍साहन देते, त्‍यामुळेच आज ९२ व्‍या वर्षीही मी तरुण आहे, मला अजून पुष्‍कळ काही करायचे आहे.’’ याच वेळी प्रतिवर्षी गानवर्धन संस्‍था आणि ‘स्‍वरमयी गुरुकुल’ यांच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या गायन स्‍पर्धांच्‍या सुगम, उपशास्‍त्रीय आणि शास्‍त्रीय गायन पुरस्‍कार विजेत्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

क्षणचित्रे

१. पुरस्‍कार वितरण सोहळ्‍यानंतर पंडित केशव गिंडे आणि त्‍यांच्‍या शिष्‍यवर्गाचे बासरीवादन झाले. यात चक्राकार श्‍वास घेत न थांबता, बासरीवादनाचे प्रात्‍यक्षिक करण्‍यात आले, तसेच केशववेणू, माधव वेणू, चैतन्‍य वेणू आणि अनाहत वेणू यांच्‍या साहाय्‍याने ७००० हर्टझचे बासरीवादन करण्‍यात आले.

२. उपस्‍थित मान्‍यवर आणि पं. गिंडे यांच्‍या वाद्यवृंदांचाही पुष्‍पगुच्‍छ देऊन सत्‍कार करण्‍यात आला.

३. महर्षी अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांची भेट घेतली.

४. टिळक स्‍मारक मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला.