पिंपरी (पुणे) येथील ‘साहित्‍य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा २०२३’ या २ ग्रंथांचे प्रकाशन !

पिंपरी (पुणे) – आजच्‍या लेखकांनी गप्‍प बसण्‍याची वृत्ती अंगी बाळगू नये. ही वृत्ती स्‍वत:च्‍या स्‍वास्‍थ्‍यासाठी योग्‍य असेल; मात्र समाजाच्‍या स्‍वास्‍थ्‍यासाठी योग्‍य नाही. भाषा ही एकमेकांना जोडणारी असते. आपण ‘फायटर’ झाल्‍याविना ‘रायटर’ होऊ शकत नाही. अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य जपण्‍यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक, ज्ञानपीठ पुरस्‍कार मिळवणारे दामोदर मावजो यांनी व्‍यक्‍त केले. ते डॉ. डी.वाय. पाटील विद्यापिठाच्‍या वतीने आयोजित ‘साहित्‍य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा २०२३’ या २ ग्रंथांच्‍या प्रकाशन समारंभी बोलत होते. या कार्यक्रमाला कुलपती डॉ. पी.डी. पाटील, माजी खासदार सुशीलकुमार शिंदे, साहित्‍यकार रामदास फुटाणे, रवींद्र शोभणे हे उपस्‍थित होते.

ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक मावजो पुढे म्‍हणाले, ‘‘सध्‍या तंत्रज्ञानात झपाट्याने पालट होत आहेत. तरुण पिढीला आवडेल अशा साहित्‍याची निर्मिती झाली पाहिजे. समाजात जे पालट होत आहेत; त्‍याचे साहित्‍यात प्रतिबिंब उमटले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षणामध्‍ये साहित्‍य हा विषय अनिवार्य केला पाहिजे.’’