विश्वशांतीसाठी संवाद महत्त्वाचा ! – डॉ. दलबीर सिंह, अध्यक्ष, वन ग्लोब फोरम

पुणे येथील ‘जी-२० इंटरफेथ समिट’ !

पुणे – भारत देश विविध धर्म आणि भाषांनी नटलेला आहे. हीच विविधता आपली मुख्य शक्ती असून ती सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. या विविधतेमुळे मतभेद होणे स्वाभाविकच आहे; परंतु ती समजून घेतली, तर मतभेदांचे रूपांतर मनभेदांमध्ये कधीही होणार नाही. हाच विश्वशांतीचा पाया असून तो समजून घेण्यासाठी संवाद होणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ‘वन ग्लोब फोरम’चे अध्यक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव डॉ. दलबीर सिंह यांनी व्यक्त केले. एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एम्.आय.टी., पुणे, ‘जी-२० इंटरफेथ अलायन्स फॉर सेफर कम्युनिटीज’ आणि अमेरिकेतील ‘जी-२० इंटरफेथ फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजबाग, लोणी काळभोर येथील जगातील सर्वांत मोठ्या विश्वशांती घुमटामध्ये आयोजित ‘जी-२० इंटरफेथ समिट’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘जी-२० इंटरफेथ समिट’चे आयोजन करण्यात आले होते.

ग्रंथाविषयी माहिती जाणून घेतांना ‘बहाई अकॅडमी’चे संचालक डॉ. लेसन आझादी (उजवीकडे)

‘जी-२० इंटरफेथ फोरम’चे अध्यक्ष डब्ल्यू कोल दूरहाम म्हणाले, ‘‘डॉ. विश्वनाथ कराड यांच्या माध्यमातून विश्वशांतीची चालू केलेली चळवळ आम्ही आणखी व्यापक स्वरूपात करू पहात आहोत. त्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताने ‘वसुधैव कुटुंबकम’चा दिलेला संदेश विश्वशांतीसाठी महत्त्वाचा आहे.’’

श्री. राहुल कराड म्हणाले की, भारताने कायमच जगाला शांती आणि आत्मशांतीचा संदेश दिलेला आहे. सध्या आपण विविध पैलूंवर पुढाकार घेऊन अग्रेसर बनत आहोत. नुकतेच चंद्रयान ३ च्या माध्यमातून आपण अंतराळातील वैश्विक शक्तीच्या दिशेने वाटचाल केली आहे. या परिषदेच्या माध्यमातून आपल्या विविधतेच्या शक्तीच्या माध्यमातून जगाला आत्मशांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. युवकांनी आता ‘इंडिया’ या ऐवजी ‘भारत’ संबोधणे आवश्यक आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये सुख, समाधान आणि शांती नांदेल. भारत हा जगात विश्वशांतीचा संदेश देणारा देश म्हणून ओळखला जात आहे.

बिशप फेलिक्स मचाडो म्हणाले की, कोणताही धर्म कधीच द्वेष शिकवत नाही, तो द्वेशाचे नव्हे, तर शांतीचे प्रतिक आहे. युद्ध आणि आतंकवादाचे चटके संपूर्ण विश्वाने भोगले आहेत. त्यामुळे युद्ध आणि अशांतता परवडणारी नाही. विश्वशांतीसाठी संवाद आवश्यक असून त्यासाठी एम्.आय.टी.ने घेतलेला पुढाकार या प्रयत्नांना बळ देणार आहे.

यानंतर प्रा. कॅथरिन मार्शल, स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी, अझरबैजान येथील धार्मिक गुरु शेख उल इस्लाम अल्लाशुकूर पाशाझादे आणि पुष्पिता अवस्थी यांनी विश्वशांतीसाठी सर्वांनी कोणती पावले उचलावीत अन् त्यासाठी कोणती भूमिका असावी यावर विवेचन केले. प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले.

१. या वेळी सनातननिर्मित ग्रंथ कक्षही लावण्यात आला होता, त्याला विविध मान्यवरांनी भेट दिली आणि ग्रंथांविषयी उत्सुकतेने जाणून घेतले. पाचगणी येथील ‘बहाई अकॅडमी’चे संचालक डॉ. लेसन आझादी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन इंग्रजी ग्रंथ घेतले आणि कार्याचे कौतुकही केले.

२. साधकांनी लोणी येथील ग्रंथालयाला भेट दिली. तेथील साहाय्यक ग्रंथपाल अर्चना अंबेकर यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी मुख्य ग्रंथपाल यांचा संपर्क क्रमांक दिला आहे. त्यांनी कार्यालयात भेटण्यास बोलावले असून ‘पुष्कळ मोठ्या प्रमाणात सर्व भाषेतील ग्रंथ लागणार आहेत’, असे सांगितले.

३. कोथरूड एम्.आय.टी. मधील ग्रंथपाल सौ. गोखले यांनी ग्रंथप्रदर्शनास भेट दिली आणि ‘इंग्रजीतील सर्व ग्रंथ हवे आहेत, भेटायला या’, असे सांगितले.

४. आळंदी एम्.आय.टी. येथील उपप्राचार्या विद्या बारटक्के यांनी ‘आमच्याकडे ग्रंथप्रदर्शन लावू शकतो’, असे सांगितले.

५. मंचर येथील प्राध्यापकांनी ‘ग्रंथ पुष्कळच छान आहेत’, असे सांगितले आणि मोठे ग्रंथ घेतले. ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी समन्वयक प्रा. नितीन जोशी आणि विद्याधर पाटील यांनी सहकार्य केले.

या वेळी यू.एस्.ए. येथील ‘जी-२० इंटरफेथ फोरम’चे अध्यक्ष डब्ल्यू कोल दुरहाम, ‘जिऑर्जटाईम विद्यापिठा’च्या प्रा. डॉ. कॅथरिना मार्शल, अमृता विश्वविद्यापिठाचे अध्यक्ष स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी, बिशप फेलिक्स मचाडो, अझरबैजान येथील धार्मिक गुरु शेख उल इस्लाम अल्लाहशुकूर पाशाझादे, बाही समुदायाच्या मार्जीया दलाल, डॉ. पुष्पिता अवस्थी, बहाई अकॅडमीचे संचालक डॉ. लेसन आझादी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. एम्.आय.टी. डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरु डॉ. आर्.एम्. चिटणीस आणि प्रभाग कुलगुरु डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.