पुणे येथे गणेशोत्‍सवासाठी पी.एम्.पी.एम्.एल्. २७० जादा बसगाड्या सोडणार !

पुणे – पी.एम्.पी.एम्.एल्. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) प्रशासनाकडून गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्‍ये जादा बसगाड्या सोडण्‍याचे नियोजन केले आहे.

१९ ते २८ सप्‍टेंबर २०२३ या कालावधीमध्‍ये २७० जादा बसगाड्या पुणेकरांना सेवा पुरवतील, असे पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने सांगितले. गणेशोत्‍सवातील देखावे पहाण्‍यासाठी शहराबाहेरून आणि शहरांतर्गत नागरिक मोठ्या संख्‍येने घराबाहेर पडतात. त्‍यामुळे बसगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्‍यामुळे प्रवाशांच्‍या सोयीसाठी विविध भागांतून जादा बस सोडल्‍या जाणार आहेत. दैनंदिन संचलन गणेशोत्‍सव कालावधीमध्‍ये रात्री १० वाजल्‍यानंतर बंद रहाणार असून त्‍यानंतर सर्व बस ‘यात्रा स्‍पेशल’ म्‍हणून संचलनात रहातील. त्‍यामुळे या वेळी ५ रुपये जादा तिकीट दर आकारणी करण्‍यात येईल, तसेच या वेळी रात्री १२ नंतर कुठल्‍याही प्रकारचे पास पी.एम्.पी.एम्.एल्.च्‍या बसमध्‍ये चालणार नाहीत, असे पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने सांगितले आहे.