प्रकाश आंबेडकर यांचा कोरेगाव भीमा आयोगासमोर दावा !
पुणे – आरक्षणावरून मराठा आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) या २ समाजांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव न्यून करण्यासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर १६ सप्टेंबर या दिवशी केला. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आंबेडकर यांची उलटतपासणी झाली. अधिवक्ता रोहन जमादार, अधिवक्ता प्रदीप गावडे आणि अधिवक्ता मंगेश देशमुख यांनी आंबेडकर यांची उलटतपासणी घेतली.
१. अधिवक्ता गावडे यांनी ‘आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे एल्गार परिषदेचे प्रसारपत्रक, साहित्य यांमध्ये उल्लेख का नव्हता ?’, असे विचारत त्यांचा हा दावा राजकीय हेतूने करत असल्याचे नमूद केले. त्यावर आंबेडकर यांनी राजकीय हेतूने हा दावा नसल्याचे आयोगासमोर सांगितले.
२. एल्गार परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र ते आजारी असल्याने आंबेडकर यांना अध्यक्ष करण्यात आले होते. या परिषदेवर नक्षलवाद आणि कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास प्रवृत केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांची या सूत्रावर उलटतपासणी घेण्यात आली. आंबेडकर यांनी आयोगाला यापूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आरोप खोटा असून हिंसाचाराचे सूत्रधार मिलिंद एकबोटे आणि पूजनीय संभाजी भिडेगुरुजी असल्याचे त्यांनी सांगितले.