अयोध्येतील श्रीराममंदिराच्या तटबंदीची उभारणी चालू !

कांस्यमध्ये कोरण्यात येत आहेत देवतांच्या ९० मूर्ती !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे श्रीराममंदिराची उभारणी युद्ध स्तरावर चालू असून नैसर्गिक आपत्तींपासून मंदिराचे रक्षण व्हावे, यासाठी उपाय योजले गेले आहेत. यांतर्गत संरक्षण करणारी भींत आणि तटबंदी उभारण्यात येत आहे. तटबंदी ही मंदिराच्या उत्तर-दक्षिण आणि पश्‍चिम दिशांना वर्गाकार रूपाने बनवण्यात येत असून आतापर्यंत तिचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तटबंदीमध्ये ५ मंदिरे उभारली जातील. यासह त्याच्यात कांस्यमध्ये ९० मूर्ती कोरण्यात येत आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने यासंदर्भातील छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली आहेत.

तटबंदीची रुंदी १४ फूट असून त्याचा उपयोग प्रदक्षिणेच्या पथाच्या रूपातही होऊ शकेल. तटबंदीची निर्मिती ही वंशीपहाडपूर येथील लाल दगडांनी केली जात असून ती मंदिराच्या सुरक्षेसमवेतच मंदिर परिसराचे आकर्षण वाढवेल, असे मंदिर न्यासाने म्हटले आहे. यासह मुख्य मंदिराच्या खांबांवर देवतांच्या ६ सहस्र मूर्ती कोरण्यात येत आहेत.