(म्हणे) ‘नेपाळकडे आधीच वीज अल्प असतांना ती भारताला का विकत आहे ?’ – चीन

नेपाळ भारताला वीज विकत असल्यावरून चीनचा थयथयाट !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ प्रतिदिन ६ कोटी ७० लाख रुपयांची वीज भारताला विकत असतो. यावर आता चीनने आक्षेप घेतला आहे. नेपाळमधील चीनचे राजदूत चेन सोंग यांनी म्हटले की, नेपाळकडे आधीच विजेचा तुटवडा आहे, तर भारताला वीज विकण्याला काहीच अर्थ नाही. भारताची धोरणे नेपाळच्या हिताची नाहीत, असा दावा केला. (भारताची धोरणे नेहमीच नेपाळच्या हिताची राहिली आहेत. नेपाळला भारतापासून तोडण्याचा डाव नेपाळमधील चीनचा राजदूत करत आहे. हे षड्यंत्र लक्षात घ्या ! – संपादक)

काही दिवसांपूर्वीच भारताने नेपाळशी करार करून १० सहस्र मेगावॅट वीज विकत घेणे चालू केले. नेपाळच्या विद्युत् प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, नेपाळ शिल्लक राहिलेली वीज भारताला विकत आहे. नेपाळ प्रतिदिन १ कोटी युनिट वीज भारताला विकत आहे.