जे सनातन धर्माला शिव्या देत आहेत, त्यांचा वर्ष २०२४ मध्ये अंत होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

वाराणसी (उत्तरप्रदेश) – जे सनातनला शिव्या देत आहेत, त्या सर्वांचा वर्ष २०२४ मध्ये (वर्ष २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत) अंत होणार आहे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून सनातन धर्म संपवण्याच्या विविध राजकीय नेत्यांकडून होणार्‍या विधानांविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देतांना ते बोलत होते.

योगऋषी रामदेवबाबा काशीचे कौतुक करतांना म्हणाले की, सनातन धर्माचे मर्म काशीमध्ये आहे. काशी एक शाश्‍वत नगरी आहे. ती अनादि आणि अनंत काळापासून उपासनेचे महातीर्थ आहे. विद्या आणि मोक्ष यांचे नगर आहे. आता संपूर्ण जगामध्ये काशी आरोग्य, धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी जगामध्ये आकषर्णाचे केंद्र बनले आहे. (काशी पर्यटनाचे नाही, तर हिंदु धर्मशिक्षणाचे केंद्र बनले पाहिजे ! – संपादक) संस्कृती आणि ज्ञान हे सनातन धर्माचे सार आहे. (सनातन धर्माच्या साराची माहिती सर्वांना देण्यासाठी ते सांगणे आवश्यक आहे. त्यासाठीची व्यवस्था निर्माण केली पाहिजे ! – संपादक)