मुंबई – कॅनरा बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले ‘जेट एअरवेज’चे संस्थापक नरेश गोयल यांना विशेष ‘पी.एल्.एम्.ए.’ न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे १४ सप्टेंबर या दिवशी त्यांना न्यायालयापुढे उपस्थित करण्यात आले होते.
कॅनरा बँकेचे कर्जवसुली आणि कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी २३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी केंद्रीय अन्वेण यंत्रणेकडे तक्रार केली होती. यावरून नरेश गोयल यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कार्यालयाद्वारे ‘जेट एअरवेज’ या आस्थापनाला कर्ज देण्यात आले होते. ५ जून २०१९ या दिवशी ‘जेट एअरवेज’ला अधिकोषाने बुडीत घोषित केले. त्यामुळे बँकेची ५३८ कोटी ५२ लाख रुपयांची हानी झाली. गोयल यांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतले, ते पैसे अन्य कामांसाठी वळवण्यात आल्याचे आढळून आले आहे.