स्‍वामी विवेकानंद यांचे मानवतावादी विचार महत्त्वाचे ! – चारुदत्त आफळे, राष्‍ट्रीय कीर्तनकार

‘विश्‍वबंधुत्‍व दिना’निमित्त राष्‍ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे पुणे येथील व्‍याख्‍यान !

पुस्‍तकांचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. जयंत कुळकर्णी, ह.भ.प. चारुदत्त आफळे, श्री. विनायक कुलकर्णी

पुणे – स्‍वामी विवेकानंद यांनी मूर्तीपूजेचे स्‍तोम माजवले नाही; पण मानवतेकडे दुर्लक्ष करू नये, हे सांगितले आहे. स्‍वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. विश्‍वबंधुत्‍व दिनानिमित्त ‘विवेकानंद केंद्र, कन्‍याकुमारी’च्‍या पुणे शाखेने ‘विश्‍वकल्‍याणासाठी विश्‍वगुरु भारत’ या विषयावर चारुदत्त आफळे यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन केले होते. त्‍या वेळी ते बोलत होते. हे व्‍याख्‍यान १० सप्‍टेंबर या दिवशी केतकर सभागृह येथे झाले. ‘विवेकानंद केंद्र कन्‍याकुमारी’ पुणे शाखेचे संचालक जयंत कुलकर्णी, विवेकानंद केंद्राचे महाराष्‍ट्र प्रांत व्‍यवस्‍था प्रमुख विनायक कुलकर्णी यांच्‍यासह मान्‍यवर उपस्‍थित होते. विवेकानंद केंद्र प्रकाशन विभागाच्‍या ‘शौर्य कथा-भाग ४’,‘सर्वस्‍पर्शी विवेकानंद’ या २ पुस्‍तकांचे प्रकाशन या वेळी करण्‍यात आले.

स्‍वामी विवेकानंदांनी ११ सप्‍टेंबर १८९३ या दिवशी अमेरिकेतील व्‍याख्‍यानात ‘अमेरिकेतील माझ्‍या बंधू आणि भगिनींनो’ या शब्‍दांनी संपूर्ण विश्‍वातील मानवतेला साद घातली होती. हा दिवस विवेकानंद केंद्रामध्‍ये ‘विश्‍वबंधुत्‍व दिन’ म्‍हणून साजरा केला जातो. त्‍यानिमित्त चालू असलेल्‍या अनेक कार्यक्रमांचा एक भाग म्‍हणून विश्‍वबंधुत्‍व दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला हे व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते.

राष्‍ट्रीय कीर्तनकार आफळे पुढे म्‍हणाले की, संकुचितपणा, धर्मांधता यांमुळे मानवतेची हानी झाली आहे, असे विवेकानंद यांनी सांगितले; मात्र धर्माचा अभिमान बाळगू नये, असे विवेकानंद यांनी सांगितलेले नाही. विश्‍वगुरु होतांना आपल्‍या आचरणाकडे लक्ष दिले पाहिजे. केवळ ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप’, ‘फेसबुक’मध्‍ये गुरफटून चालणार नाही.