सातारा येथील साधिका सौ. वैशाली अमित घाडगे यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव आणि गुरुकृपा यांमुळे त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘सातारा येथील साधिका सौ. वैशाली अमित घाडगे यांचा गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) असलेला भाव आणि गुरुकृपा यांमुळे त्यांना विविध अनुभूती आल्या. गुरुदेवांनी त्यांना स्वप्नाद्वारे मार्गदर्शन करणे, सकारात्मक विचार देऊन तिला स्वभावदोषांची जाणीव करून देणे, यांमुळे त्यांच्यामध्ये पालटही झाले, यांविषयी त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सौ. वैशाली घाडगे

१. गुरुदेवांच्या कृपेमुळे सेवा करता येणे

‘मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच मला सेवा उपलब्ध करून द्या.’ नंतर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अपार कृपेमुळे मला बालसंस्कारवर्ग घेणे, सत्संग घेणे, धर्मशिक्षणवर्ग घेणे, प्रवचने घेणे, तसेच सामाजिक माध्यमांशी (सोशल मिडियाशी) संबंधित सेवा करणे आणि भ्रमणभाषवरून संपर्क करणे इत्यादी सेवा मिळाल्या अन् भगवंतच त्या माझ्याकडून करून घेत आहे.

२. सेवा करतांना स्वभावदोषांची जाणीव होणे

मी सेवा करत नव्हते, तेव्हा मला वाटायचे, ‘मी पुष्कळ चांगली आहे. माझ्यात काही स्वभावदोष नाहीत.’ मी सेवा करू लागल्यावर मला माझे स्वभावदोष दिसू लागले.

३. गुरुकृपेमुळे रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळणे

मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची पुष्कळ इच्छा होती. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला रामनाथी आश्रमात जाण्यासाठी घरच्यांनी अनुमती दिली आणि मला रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली.

४. देवाने सकारात्मक विचार देऊन सासूबाईंप्रतीचा राग आणि प्रतिक्रिया यांचे प्रमाण न्यून करणे

४ अ. गुरुदेवांनी ‘तुझी आई असती, तर काय केले असते ?’, असा विचार दिल्याने सासूबाईंवरील राग न्यून होणे : मी सेवेला जातांना माझ्या सासूबाई मला घरातील कामे सांगत. तेव्हा मला त्यांचा पुष्कळ राग आणि त्यांच्याविषयी पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या. त्या वेळी गुरुदेवांनी मला विचार दिला, ‘तुझी आई असती, तर तू काय केले असतेस ?’ त्यानंतर मी भावसत्संग ऐकत त्यांनी सांगितलेली कामे ‘सेवा’ म्हणून करू लागले. त्यामुळे माझा सासूबाईंवरील राग न्यून झाला आणि मी त्या सांगत असलेली कामे ‘सेवा’ म्हणून करू लागल्याने मला आनंद मिळू लागला.

४ आ. भगवंताने दिलेल्या विचाराने सासूबाईंप्रती राग आणि प्रतिक्रिया यांचे प्रमाण उणावणे : भगवंताने मला आणखी एक विचार दिला, ‘मी सासूबाई, यजमान आणि घरातील इतर सदस्य यांच्यावर प्रेम करू शकत नाही, तर मी समाजातील इतर व्यक्ती किंवा साधक यांच्यावर प्रेम कसे करणार ?’ त्यानंतर मला सासूबाईंचा राग येणे आणि त्यांच्याप्रती प्रतिक्रिया येणे यांचे प्रमाण उणावले.

५. सत्संगातील जिज्ञासू महिलेची विचारपूस केल्यावर तिचे बोलणे ऐकून गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे

एकदा सत्संगातील एक जिज्ञासू महिला पुष्कळ रुग्णाईत होत्या. तेव्हा मी संपर्क करून त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही किती प्रेमाने बोलता आणि माझी विचारपूस करता. ‘मला अगदी माझी आईच विचारपूस करत आहे’, असे वाटले. आमच्या घरचे, तर मला एका शब्दानेही विचारत नाहीत.’’ तेव्हा माझ्या मनात ‘गुरुदेवांनी आपल्याला प्रेम करायला शिकवले आहे’, असा विचार आला. ‘गुरुदेव आपल्याला लहान लहान गोष्टींतून पुष्कळ शिकवत आहेत’, याची जाणीव होऊन त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

६. अपघात होऊन गुरुकृपेने यजमानांचा जीव वाचणे

६ अ. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे गाडी कठड्याजवळ थांबल्यामुळे यजमानांचा जीव वाचणे : माझे यजमान एकदा चारचाकीने घाटातून चालले होते. गाडी चालवतांना त्यांना थोडीशी डुलकी लागली. तेव्हा खरेतर गाडी दरीतच कोसळली असती; परंतु गुरुदेवांच्या कृपेमुळे गाडी कठड्याजवळ थांबली आणि माझ्या यजमानांचा जीव वाचला.

६ आ. मालगाडी अकस्मात् उतारावरून खाली येतांना यजमानांनी स्वतःची दुचाकी आडवी लावतांना तिचे ब्रेक त्यांच्या पोटाला लागणे; पण ईश्वराच्या कृपेने त्यांना कोणतीही दुखापत न होणे : एकदा मालगाडी उतारावरून अकस्मात् खाली येऊ लागली. त्या गाडीत काम करणारा एक मुलगा माल भरत होता. गाडीत चालक नव्हता. तेथेच माझे यजमान उभे होते. त्यांनी गाडी थांबावी; म्हणून स्वतःची दुचाकी आडवी लावली. तेव्हा दुचाकीचे ब्रेक त्यांच्या पोटाला लागले; पण ईश्वराच्या कृपेने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. हे केवळ गुरुदेवांच्या अगाध कृपेमुळेच शक्य झाले.

७. स्वप्नामध्ये गुरुदेवांनी प्रतिदिन १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करण्यास सांगणे

२७.६.२०२२ या दिवशी माझ्या आईचे (श्रीमती शशिकला पांडुरंग सोनवणे हिचे) निधन झाले. आईच्या मृत्यूच्या ४ दिवस आधी गुरुदेव माझ्या स्वप्नामध्ये आले. माझे त्यांच्याशी स्वप्नात बोलणे झाल्यावर त्यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप प्रतिदिन १ घंटा करायला सांगितला. त्याप्रमाणे मी प्रतिदिन नामजप करत होते.

८. मृत्यूनंतर आईसाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे आणि त्यानंतर तिच्या देहामध्ये पालट होणे

आईच्या निधनापूर्वी तिच्या डोळ्यांखाली पुष्कळ काळे झाले होते, तसेच हातांच्या बोटांची पेरेही काळी झाली होती. तिच्या अंगावर लाल चट्टे उठण्यास आरंभ झाला होता. आईच्या मृत्यूनंतर देवाच्या कृपेने आम्हाला नामजपादी आध्यात्मिक उपायांची आठवण झाली. मी, माझी बहीण माधुरी सोनवणे आणि सौ. संगीता लेंगे आम्ही सर्वांनी एकत्र प्रार्थना करून तिच्या शरिराभोवती कापराचे मंडल केले. तिच्या दोन्ही पायांचे अंगठे लाल धाग्याने बांधले. कापुराची पूड कापसामध्ये ठेवून ते कापसाचे बोळे तिच्या कान आणि नाक यांमध्ये ठेवले. श्रीकृष्णाचे लहान चित्र तिच्या अनाहतचक्र आणि स्वाधिष्ठानचक्र या ठिकाणी ठेवले. प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) रथामध्ये बसलेले छायाचित्र असलेले साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक तिच्या अंगावर ठेवला. त्यामुळे काही वेळानंतर आईच्या चेहर्‍यात पालट होऊन ती शांत आणि प्रसन्न दिसू लागली. तिच्या हातांची बोटे पूर्णपणे पिवळी झाली होती. तिच्या शरिराची त्वचा लहान मुलासारखी मऊ झाली होती. ती पुष्कळ शांत वाटत होती. आईच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर आम्ही सर्व बहिणी स्थिर होतो. वैकुंठभूमीमध्ये कोणताही दाब जाणवत नव्हता. सर्व जण शांत आणि स्थिर होते. गुरुमाऊलींनीच आम्हा सर्वांकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप सलग १३ दिवस करून घेतला. आमची कोणतीही पात्रता नसतांना हे केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच आम्हाला अनुभवायला मिळाले.

९. कृतज्ञता

खरंच, भगवंत आपल्याकडून किती साधना करून घेतो, तसेच आपल्याकडून कृती करून घेऊन अनुभूतीही देतो. सर्वकाही भगवंतच करत आहे. त्या भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. वैशाली अमित घाडगे, शाहूपुरी, सातारा. (७.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक