पंचनाम्‍यातील अनेक नोंदी पोलिसांनी सांगितल्‍यामुळे पंचांनी नमूद केल्‍या ! – अधिवक्‍ता अनिल रुईकर

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरण

कॉ. गोविंद पानसरे

कोल्‍हापूर – संशयित समीर गायकवाड यांच्‍या घराचा ‘घरझडती पंचनामा’ करण्‍यात आला. या पंचनाम्‍यातील वस्‍तू अन्‍वेषण अधिकार्‍यांसमोर कोल्‍हापूर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात पंच रहमतुल्ला पटेल यांनी ओळखल्‍या. घरझडतीत जप्‍त केलेली पुस्‍तके आणि पत्रके यांवर समीर गायकवाड यांचे नाव नाही, ‘एखाद्या गोष्‍टीचे प्रबोधन करणे’ म्‍हणजे आक्षेपार्ह आहे का ? समीर गायकवाड यांच्‍या ‘डायरी’त अनेक नावे आणि लिखाण असतांना केवळ एका विशिष्‍ट व्‍यक्‍तीचेच नाव पंच पटेल यांनी नमूद केले. त्‍यामुळे या सर्व गोष्‍टी पंच पटेल यांनी पडताळल्‍या नसून पंचनाम्‍यातील अनेक नोंदी पोलिसांनी सांगितल्‍यामुळे पंचांनी नमूद केल्‍या आहेत, असे अधिवक्‍ता अनिल रुईकर यांनी पंचांच्‍या उलटतपासात न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले.

कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू आहे. १७ सप्‍टेंबर २०१५ या दिवशी समीर गायकवाड यांच्‍या घरातून जप्‍त केलेल्‍या वस्‍तू अन्‍वेषण अधिकार्‍यांसमोर पडताळणीसाठी आणलेल्‍या असतांनाच त्‍या पंच पटेल यांनी ओळखल्‍या. त्‍या प्रकरणाची साक्ष पटेल यांनी न्‍यायालयात दिली. त्‍यांची उलटतपासणी अधिवक्‍ता अनिल रुईकर आणि अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी घेतली. सरकार पक्षाच्‍या वतीने अधिवक्‍ता हर्षद निंबाळकर आणि अधिवक्‍ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.

या प्रसंगी अधिवक्‍ता आदित्‍य मुदगल, अधिवक्‍त्‍या स्नेहा इंगळे, अधिवक्‍त्‍या अनुप्रिता कोळी, अधिवक्‍त्‍या प्रीती पाटील उपस्‍थित होत्‍या. या खटल्‍यात एकूण १२ संशयित आरोपी असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑक्‍टोबरला होणार आहे.