साधिकेने ‘ती श्रीकृष्‍णाच्‍या खांद्यावरील शेला आहे’, असा भावजागृतीचा प्रयत्न केल्‍यावर अनुभवलेली भावस्‍थिती

‘दैवी बालकांच्‍या सत्‍संगात प्रत्‍येकाला भावजागृतीसाठी वेगवेगळा भाव ठेवण्‍यास सांगितला होता. मला ‘तुम्‍ही श्रीकृष्‍णाच्‍या खांद्यावरील शेला आहात’, असा भावजागृतीचा प्रयत्न करण्‍यास साधिकेने सांगितले. हा भावजागृतीचा प्रयत्न करायला मिळाल्‍यावर मला पुष्‍कळच आनंद झाला. तेव्‍हा ‘भाव कसा अनुभवायचा ?’, या संदर्भात पुढील विचार प्रक्रिया होऊन भाव अनुभवता आला.

१. श्रीकृष्‍णाने ‘शेल्‍याविषयी भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी मार्गदर्शन करणे

सौ. निवेदिता जोशी

सत्‍संग झाल्‍यावर ‘तो भाव मला अनुभवायचा आहे’, असे म्‍हणून मी रामनाथी आश्रमातील स्‍वागतकक्षातील श्रीकृष्‍णाचे भावपूर्ण दर्शन घेतले. दर्शन घेतांना ‘तो शेला, म्‍हणजे मी आहे. श्रीकृष्‍ण त्‍याला कधीच विसरत नाही. तो सतत श्रीकृष्‍णाच्‍या समवेत असतो’, असे विचार माझ्‍या मनात आले. ‘त्‍या शेल्‍यावरील सोनेरी ठिपके, म्‍हणजे दैवी गुण आहेत. मला ते सगळे गुण आत्‍मसात करायचे आहेत. त्‍याच्‍यासाठी मला प्रक्रिया अधिक तळमळीने राबवायची आहे; हे सर्व श्रीकृष्‍ण मला सांगत आहे’, असे मला जाणवले.

२. शेल्‍याविषयी भाव ठेवल्‍यावर जाणवलेली सूत्रे

अ. ‘शेल्‍याच्‍या दोन्‍ही कडा, म्‍हणजे द्वैत आणि अद्वैत साधणार्‍या दोन कडा आहेत’, असे मला वाटले.

आ. ‘प्रत्‍येक क्षणाला श्रीकृष्‍णाच्‍या दिव्‍य देहाचा स्‍पर्श होऊन माझा प्रवास अंतःकरण शुद्धीकडे होत आहे’, असे मला जाणवले.

इ. ‘माझा जन्‍मोजन्‍मीचा भार श्रीकृष्‍णाने वाहिला असून, आता या जन्‍मात गुरुरूपात भेटून तो मला अद्वितीय आनंदाकडे घेऊन जात आहे’, असे मला जाणवले.

३. ‘प्रत्‍येक युगात श्रीकृष्‍णाचा शेला कसा असेल ?’, याविषयी जाणवलेली सूत्रे

अ. मी जर श्रीकृष्‍णाचा शेला आहे, तर मी प्रत्‍येक युगात श्रीकृष्‍णाच्‍या समवेत आहे.

आ. सत्‍ययुगात माझा रंग पिवळसर सोनेरी होता. त्‍यातून मला चैतन्‍य आणि शक्‍ती मिळत होती. श्रीविष्‍णूचे सामिप्‍य मला सतत लाभत होते. मी श्रीविष्‍णूचे एकनिष्‍ठेने पूजन करत होते.

इ. त्रेतायुगात मी श्रीरामाच्‍या खांद्यावरील निळ्‍या रंगाचा शेला झाले. या युगात मला क्षात्रतेजाचे प्रसारण करून श्रीरामाची सेवा करायची होती. श्रीरामाचे सामिप्‍य याही युगात मला मिळाले.

ई. मला पुढे श्रीकृष्‍णाच्‍या खांद्यावरील गुलाबी शेला होण्‍याचे सौभाग्‍य लाभले. तेव्‍हा माझ्‍या आनंदाला पारावारच राहिला नाही. श्रीकृष्‍णाच्‍या खांद्यावर मी अलगद विसावले.

उ. श्रीकृष्‍ण मला म्‍हणाला, ‘‘आता तुला सर्वांना निरपेक्ष प्रेम द्यायचे आहे. हा गुण तुला वाढवायचा आहे.’’ तेव्‍हा माझ्‍याकडून ‘माझ्‍यामध्‍ये तो गुण येऊ दे’, अशी श्रीकृष्‍णाच्‍या चरणी प्रार्थना झाली. ‘या शेल्‍याच्‍या कणाकणांत तुझे आणि केवळ तुझेच अस्‍तित्‍व राहू दे. शेल्‍यातील अहंकार आणि कर्तेपणा समूळ नष्‍ट करून तुझ्‍या चरणी सामावून घे’, अशी मी शरणागतीने प्रार्थना केली. तेव्‍हा शेला अधिकच आनंददायी झाला. श्रीकृष्‍णाची प्रीती तो अनुभवत होता. ‘श्रीकृष्‍णाच्‍या प्रीतीचे प्रक्षेपण त्‍याला करायचे आहे’, हा भाव माझ्‍या मनात उचंबळून येत होता.

४. ‘तू श्री दत्त अवतारात माझी झोळी आहेस’, असे श्रीकृष्‍णाने सांगणे

अ. मी श्रीकृष्‍णाला मनात म्‍हटले, ‘आता श्रीजयंत हे सच्‍चिदानंद परब्रह्म आहेत. श्री गुरुदेव दत्त आहेत. मग मी कुठे आहे ?’ तेव्‍हा श्रीकृष्‍णाने सांगितले, ‘तू श्री दत्त अवतारात माझी झोळी आहेस आणि झोळीशिवाय मी राहू शकत नाही. तुझा रंग भगवा आहे. वैराग्‍य, शांती आणि चैतन्‍य यांचा हा रंग घेऊन गुरुदेवांच्‍या ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामाचा तुला प्रसार करायचा आहे.’

आ. ‘झोळीच्‍या माध्‍यमातून मला श्री गुरुदेवांनी त्‍यांच्‍याजवळ ठेवले आहे. सर्वांकडे ‘ॐ भवति भिक्षां देहि ।’ असे म्‍हणत झोळीत ज्ञान, भक्‍ती आणि वैराग्‍य इत्‍यादी भरून ती श्रीगुरुचरणी अर्पण करायची आहे. सातत्‍याने शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहायचे आहे’, असे मला वाटत होते.

५. प्रार्थना

‘हे गुरुदेवा, माझी शिकण्‍याची स्‍थिती सतत जागृत ठेवून तुम्‍हाला अपेक्षित असे घडवून घ्‍या’, अशी आपल्‍या श्रीचरणी आर्ततेने प्रार्थना आहे.

६. कृतज्ञता

ही सर्व भावस्‍थिती दिवसभर अखंड टिकून होती. रात्री झोपेतही श्रीकृष्‍णाचे शेलाधारी रूप डोळ्‍यांसमोर येत होते. अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्रीकृष्‍णाच्‍या चरणी,  सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या चरणी, हा भावजागृतीचा प्रयत्न सांगणार्‍या दैवी बालसाधकांच्‍या चरणी  कोटीशः वंदन आणि कृतज्ञता !’

– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), ठाणे. (१९.८.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक