‘लाल परी’ची दु:स्थिती !

पाऊस चालू असतांना एका हातात छत्री घेऊन बस चालवतांना चालक 

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतीत पाऊस चालू असतांना चालक एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात बसचे ‘स्टेअरिंग’ घेत बस चालवत असल्याचे दिसते. पावसाळी अधिवेशनाच्या काळातही गडचिरोली-चामोर्शी मार्गावर अर्धवट छत उडालेल्या अवस्थेत धावणार्‍या बसची चित्रफीत सार्वत्रिक झाल्याने सरकारवर टीकेची झोड उठली होती. खराब आणि खड्ड्यांचे रस्ते, गाड्यांच्या वेळेची पराकोटीची अनियमितता, चालक-वाहक यांची नागरिकांशी संवाद साधण्याची अयोग्य पद्धत, बसस्थानकांची बिकट स्थिती, बसचा खडखड आवाज इत्यादी कारणांमुळे नागरिकांना एस्.टी. महामंडळाच्या बसने प्रवास नकोसा वाटतो. त्यातच बसगाड्यांच्या तुटलेल्या छतातून गळणारे पाणी, आसनांचे फोम फाटलेले, खुर्च्यांचे हात तुटलेले, उभे राहून प्रवास करायचा, तर धरायला हँडल नाही, गाडीत चढण्यासाठीच्या पायर्‍या वाकलेल्या आदी कारणांमुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा होतोे. अशातच चालक इतक्या बिकट परिस्थितीत गाड्या चालवतात म्हटल्यावर सारा प्रवास प्रवासी जीव मुठीत धरूनच करत असणार, यात शंका नाही.

एस्.टी. महामंडळाच्या गाड्यांतील अशा प्रकारच्या असुविधांमुळे सामान्य नागरिक खासगी वाहनांमध्ये धोका असूनही अतिरिक्त व्यय करून प्रवास करतात. एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले, त्यामागे वरील स्थितीकडे असलेले प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, अधिकार्‍यांची जनतेच्या अडचणींविषयीची असंवेदनशीलता आदी गोष्टी कारणीभूत आहेत. या असुविधांमुळे राज्यातील एस्.टी. महामंडळाच्या ‘लाल परी’ला प्रवाशांनी कायमचा लाल झेंडा दाखवण्याची वेळ आली होती; परंतु ती वेळ येऊ नये म्हणून आता प्रशासनाने महिलांना अर्धे तिकीट देण्यासारख्या सुविधा देऊन प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे परिवहन मंडळाची स्थिती सुधारत चालली आहे; परंतु वरील समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने विचारप्रक्रिया होतांना दिसत नाही. राज्य सरकार, परिवहन मंडळ प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितरित्या राज्यातील एस्.टी. महामंडळाच्या गाड्यांची अत्यंत बिकट अवस्था, आगारांची दुरवस्था यांमुळे होणारी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन सुविधा आणि उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करून, त्यावर कायमस्वरूपी तसेच दीर्घकालीन उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल