बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिला

पुणे – येथील बुधवार पेठ परिसरातून ३१ ऑगस्टला रात्री १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे. हे सर्वजण अवैध पद्धतीने पुण्यात वास्तव्य करतांना आढळून आले आहेत. यात १० बांगलादेशी महिलांसह ९ पुरुषांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बुधवार पेठ परिसरात शोधमोहीम हाती घेत महिला आणि पुरुष यांना अटक केली आहे. हे बांगलादेशी नागरिक बुधवार पेठेत ३ मासांपासून आहेत. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पुणे पोलीस दलातील सामाजिक सुरक्षादलाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर देहविक्री धंदा चालू असतो. बुधवार पेठेत देशविदेशांतील वारांगना देहविक्रय करतात. बांगलादेशातील महिला बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात धडक कारवाई केली.

संपादकीय भूमिका :

बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे. बांगलादेशींना शोधून काढणे, त्यांची नावे मतदारसूचीतून काढणे आणि त्यांना बांगलादेशात परत पाठवणे, हाच यावर उपाय आहे !