भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळाले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्‍वसार्हता संपेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा आणि पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अशा वेळी जर भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्‍वासार्हर्ता संपेल. यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांत पालट करण्यासाठी दबाव आणत राहू, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

डॉ. जयशंकर यांनी मांडलेली सूत्रे

१. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना वर्ष १९४० मध्ये करण्यात आली होती. तेव्हा यात केवळ ५० सदस्य होते. आता ही संख्या २०० झाली आहे. त्यामुळे काळानुसार यात पालट होणे आवश्यक आहे. जर याकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर संयुक्त राष्ट्रांची विश्‍वासार्हताच हळूहळू अल्प होत जाईल. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांनी हे स्वीकारावे की, आता पालट करण्याचा वेळ आली आहे.

२. सध्या या परिषदेत स्थायी सदस्यत्व असणारे देश सदस्यत्व सोडण्यास सिद्ध नाहीत. अशा वेळी सदस्य संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. आफ्रिका खंडातून एकही देश संयुक्त राष्ट्रांमध्ये नाही. दक्षिण अमेरिकेतून कोणताही देश नाही. जगात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वांत मोठा देश असलेला भारतही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नाही.