…तो दिवस दूर नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानमध्‍ये एकही हिंदु शेष रहाणार नाही !

१. पाकिस्‍तानमधील हिंदूंची असाहाय्‍य स्‍थिती !

गांधीजींसमवेत अहिंसकपणे स्‍वातंत्र्यलढा लढणारे खान अब्‍दुल गफार खान हे भारताच्‍या फाळणीचे कट्टर विरोधक होते. फाळणी झाली, तरी वायव्‍य सरहद्द प्रांत, म्‍हणजेच आजचा खैबर पख्‍तूनख्‍वा भारताकडेच रहावा, अशी त्‍यांची इच्‍छा होती. जेव्‍हा त्‍यांची मागणी मान्‍य झाली नाही आणि भारताची फाळणी झाली, तेव्‍हा त्‍यांनी गांधीजींना सांगितले, ‘‘तुम्‍ही आम्‍हाला लांडग्‍यांच्‍या स्‍वाधीन केले आहे.’’ पाकिस्‍तानच्‍या निर्मितीनंतर खान अब्‍दुल गफार खान यांना तेथे वाईट वागणूक मिळाली. त्‍यांना देशद्रोही ठरवून कारागृहातही टाकण्‍यात आले. आजही पाकिस्‍तानमध्‍ये पश्‍तून उपेक्षित आहेत. सर्व अडचणी असूनही त्‍यांच्‍या अस्‍तित्‍वाला आणि त्‍यांच्‍या अस्‍मितेला तसा धोका नाही, जसा पाकिस्‍तानी हिंदूंसमोर आहे. पाकिस्‍तानी हिंदू खरोखरच ‘लांडग्‍यां’च्‍या पुढ्यात आहेत. त्‍यांची कोणत्‍याही प्रकारे सतत ‘शिकार’ केली जात आहे. हे समजून घेण्‍यासाठी पाकिस्‍तानातून नुकत्‍याच आलेल्‍या ३ बातम्‍या पहा…

राजीव सचान

१ अ. हिंदु समाजाला लक्ष्य न करण्‍याचे पाकिस्‍तानच्‍या हिंदु मंत्र्याचे डाकूंना आवाहन : पहिल्‍या बातमीत असे सांगण्‍यात आले होते की, पाकिस्‍तानातील सिंध प्रांतात काही डाकूंनी गोळीबारासह एका हिंदु मंदिरावर रॉकेटने आक्रमण केले. रॉकेटचा स्‍फोट झाला नसल्‍याने मंदिराची कोणतीही मोठी हानी झाली नाही. या डाकूंनी सिंधमधील सर्व हिंदु मंदिरे नष्‍ट करण्‍याची धमकी दिली. त्‍यानंतर सिंध प्रांताचे अल्‍पसंख्‍यांक व्‍यवहारमंत्री ज्ञानचंद्र इसरानी यांनी हिंदु समाजाला लक्ष्य न करण्‍याचे आवाहन डाकूंना केले. यावरून हिंदूंच्‍या दयनीय स्‍थितीचा अंदाज लावा. सिंध विधानसभेत त्‍यांनी ही मागणी केली. आपल्‍या समुदायाचे रक्षण करण्‍यासाठी डाकूंना विनंती करणारा मंत्री, हे केवळ पाकिस्‍तानातच घडू शकते. आपल्‍या समाजाच्‍या रक्षणासाठी प्रशासन काही करील, यावर हिंदु समाजाच्‍या नेत्‍यांचाही विश्‍वास नाही, हे यावरून समजू शकते. पाक प्रशासनावर विश्‍वास कसा ठेवायचा ?; कारण सिंधमध्‍ये प्रत्‍येक दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी एका अल्‍पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बळजोरीने इस्‍लाम धर्म स्‍वीकारण्‍यास भाग पाडले जात असल्‍याचे ते प्रतिदिन पहात आहेत. या बहुतांश घटनांमध्‍ये अपहरण करणार्‍या मुसलमानाशीच तिचे लग्‍न लावून दिले जाते. संपूर्ण पोलीस, न्‍यायालय आणि सरकारी लोक एकतर अपहरणकर्त्‍यांना साहाय्‍य करतात किंवा निर्लज्‍जपणे म्‍हणतात, ‘मुलगी प्रौढ आहे आणि तिने स्‍वेच्‍छेने इस्‍लाम स्‍वीकारला आहे.’ मुलीचे आई-वडील रडतच रहातात; पण ते कुठेच ऐकू येत नाही. होय, काही चांगल्‍या मनाचे  पाकिस्‍तानी ‘ट्‍विटर’, ‘फेसबुक’ किंवा ‘यू ट्यूब’ वाहिनीवर या अत्‍याचार आणि अन्‍यायाचा निषेध करतात. काही वेळा काही दूरचित्रवाहिन्‍या आणि वृत्तपत्रेही बातम्‍या प्रसिद्ध करतात; १०० पैकी ९० घटनांमध्‍ये हिंदु मुलगी तिच्‍या पालकांकडे परत जात नाही.

एका आकडेवारीनुसार एकट्या सिंधमध्‍ये प्रतिवर्षी सुमारे१ सहस्र हिंदु मुलींना बलपूर्वक इस्‍लाम स्‍वीकारण्‍यास भाग पाडले जाते. तसेच त्‍यांच्‍याशी बलपूर्वक लग्‍न केले जाते. यासाठी मियां मिठू नावाचा एक गुंड मौलवी (इस्‍लामचे धार्मिक नेते) टोळी चालवतो. त्‍याच्‍या या कृत्‍यामुळे ब्रिटनने त्‍याच्‍यावर बंदी घातली आहे; पण त्‍याच्‍या विरोधात बोलायला कोणताही राजकीय पक्ष सिद्ध नाही. त्‍याच्‍या अटकेचा तर विचारच करू शकत नाही.

१ आ. पाकिस्‍तानमध्‍ये हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर : पाकिस्‍तानच्‍या सिंध प्रांतातून आणखी एक बातमी आली की, ३० हिंदु महिला आणि मुले यांना ओलीस ठेवण्‍यात आले आहे. यामागचे कारण काय आहे, हे लगेच कळू शकले नाही. त्‍यांना एकतर बलपूर्वक मुसलमान बनवले जाईल किंवा करार करून कामगार बनवले जाईल, अशी भीती व्‍यक्‍त केली जात आहे. पाकिस्‍तानात असे बरेच घडते. हिंदूंंच्‍या गरिबीचा लाभ घेऊन त्‍यांना साहाय्‍य करण्‍याच्‍या नावाखाली इस्‍लाम धर्म स्‍वीकारण्‍यास सांगितले जाते. जीवन-मरणाच्‍या अवस्‍थेतून जात असलेल्‍या गरीब हिंदूंना हे करणे भाग आहे.

१ इ. पाकिस्‍तानमध्‍ये १५० वर्षे प्राचीन हिंदु मंदिर बुलडोझरने उद़्‍ध्‍वस्‍त : तिसरी बातमीही सिंधमधून आली. कराचीतील हिंदूंचे १५० वर्षे प्राचीन मारीमाता मंदिर रात्री पोलिसांच्‍या उपस्‍थितीत बुलडोझरने जमीनदोस्‍त करण्‍यात आले. हे काम चांगल्‍या प्रकारे करण्‍यासाठी परिसरातील वीज खंडित झाली. हे मंदिर जीर्ण झाल्‍याचे सांगण्‍यात आले. पाकिस्‍तानमध्‍ये शेकडो वर्षे जुन्‍या इमारती पाडण्‍याची प्रथा आहे का ? नाही; पण एखादे मंदिर पाडायचे असेल किंवा त्‍याची भूमी बळकवायची असेल, तर पाकिस्‍तानींना निमित्तांची कमतरता नाही. हे मंदिर खोट्या मार्गाने विकल्‍याची चर्चाही समोर येत आहे. ‘या मंदिराच्‍या जागी दुसरे काहीही बांधू दिले जाणार नाही’, असे सिंध सरकारने म्‍हटले असले, तरी त्‍यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे; कारण पाकिस्‍तानमध्‍ये एकदा पाडलेले मंदिर पुन्‍हा कधीही उभे रहात जात नाही. या कारणास्‍तव तेथे शेकडो मंदिरांचे अस्‍तित्‍व नाहीसे झाले आहे.

२. पाकिस्‍तानातील हिंदूंचे अस्‍तित्‍व टिकवण्‍यासाठी भारताने पुढाकार घ्‍यावा !

तो दिवस लांब नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानात एकही हिंदु उरणार नाही. आकडेवारी याची पुष्‍टी करतात. फाळणीच्‍या वेळी २२-२३ टक्‍के हिंदू होते. बांगलादेशच्‍या निर्मितीनंतर ते सुमारे ११-१२ शेष राहिले. आज ते २ टक्‍केही नाहीत. शेवटी हे २ टक्‍के किती दिवस टिकणार ? हा प्रश्‍न आहे; कारण त्‍यांच्‍या विनाशावर भारतासह जगानेही मौन बाळगले आहे. तसेच नागरिकत्‍व सुधारणा कायदा अजूनही थंडबस्‍त्‍यात आहे, हे लक्षात ठेवा.

खरे तर पाकिस्‍तानी हिंदू त्‍यांचे शेवटचे श्‍वास मोजत आहेत. काही मूठभर लोक वगळता, सामान्‍य पाकिस्‍तानी जनता हिंदूंविषयी द्वेषाने भरलेली आहे; कारण आजही तेथील शाळांमध्‍ये हे शिकवले जाते की, ‘हिंदू केवळ काफिर आणि सैतानच नाहीत, तर देशद्रोही आणि मानवतेचे शत्रूही आहेत.’

– राजीव सचान, साहाय्‍यक संपादक, दैनिक जागरण

(साभार : दैनिक ‘जागरण’)

संपादकीय भूमिका

पाकिस्‍तानी हिंदू शेवटचे श्‍वास मोजत असतांना भारत सरकारने त्‍यांच्‍याविषयी काहीही न करणे, हे संवेदनाशून्‍य !