कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर, वेर्णा येथील श्री महालसा मंदिर आणि जुने गोवे येथील चर्च यांना दिली भेट
पणजी, २४ ऑगस्ट (वार्ता.) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसांचा गोवा दौरा आटोपून २४ ऑगस्ट या दिवशी दुपारी देहलीला परतल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २४ ऑगस्ट या गोवा दौर्याच्या शेवटच्या दिवशी कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर, वेर्णा येथील श्री महालसा मंदिर आणि जुने गोवे येथील बासिलिका बॉम जीसस चर्च यांना भेटी दिल्या.
#दिल्ली– राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू की गोवा यात्रा का आज अंतिम दिन था। अपनी यात्रा के अंतिम दिन राष्ट्रपति मुर्मू बेसिलिका ऑफ बॉम जीसस, शांतादुर्गा मंदिर और महालसा नारायणी मंदिर में पूजा अर्चना की।#Goa#Goavisit@rashtrapatibhvn pic.twitter.com/bs47gGxmXb
— Hindusthan Samachar News Agency (@hsnews1948) August 24, 2023
राष्ट्रपती मुर्मू आकस्मिकरित्या ‘जी.व्ही.एम्स.’ महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये मिसळल्या
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जुने गोवे येथील चर्चला भेट दिल्यानंतर कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी जात होत्या. त्यांचा ताफा फर्मागुडी येथे पोचला असता विद्यार्थ्यांनी त्यांना हात उंचावून अभिवादन केले. विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर राष्ट्रपतींनी गाडी थांबवली आणि खाली उतरून चालत ‘जी.व्ही.एम्स.’च्या संकुलात येऊन त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत काही क्षण घालवले. यानंतर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्या पुढील प्रवासाला मार्गस्थ झाल्या. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर आणि वेर्णा येथील श्री महालसा मंदिर यांना भेटी दिल्या. तेथील मंदिरांच्या समित्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले. दोन्ही मंदिरांमध्ये श्रींचे दर्शन घेतल्यानंतर त्या देहलीला परतीच्या प्रवासाला निघाल्या.
राष्ट्रपती मुर्मू यांची श्री शांतादुर्गादेवीकडे देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना !
राष्ट्रपती मुर्मू यांनी कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गादेवीकडे ‘नागरिकांचा उद्धार व्हावा, तसेच देशाचा विकास आणि समृद्धी व्हावी’, अशी प्रार्थना केली. ही प्रार्थना त्यांनी मंदिरात ठेवलेल्या वहीत लिहिली आहे.
भगवना परशुराम यांच्यानंतर आता बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारणार
राज्यशासनाने कांपाल येथे भगवान परशुराम यांचा पुतळा उभारला आहे. आता गोव्यात आदिवासी समाजाचा अस्मिताबिंदू असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला जाणार आहे. राज्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची २३ ऑगस्ट या दिवशी भेटी घेतली. या वेळी डॉ. मधु घोडकिरेकर यांनी गोव्यात बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी असा पुतळा उभारण्याची सूचना गोवा सरकारला केली आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याला संमती दिली. डॉ. मधु घोडकिरेकर यांनी या वेळी हुशारीने आदिवासींसाठी राजकीय आरक्षणाचे सूत्र राष्ट्रपती मुर्मू यांच्यासमोर मांडले. या वेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेऊन गोव्यातील धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा देण्याची मागणी केली.