साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने वाचकांच्या प्रतिक्रिया

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ध्येयाप्रती अभंग आणि अढळ निष्ठा, कार्याप्रती समर्पितता, अखंड दीर्घोद्योग आणि प्रत्येक हिंदूप्रती जिव्हाळा ही मूल्ये घेऊन उभे ठाकलेल्या ‘सनातन प्रभात’प्रति कृतज्ञता !बघता बघता २५ वर्षे पूर्ण झाली. खरंच वाटत नाही, ‘सनातन प्रभात’ साप्ताहिक २५ वर्षांचे झाले !

अगदी शून्यातून प्रारंभ झाला होता सनातनचा ! पण उद्दिष्ट आणि ध्येय ठाम होते. क्षितिजावर दूर दिसणारा हिंदु राष्ट्राचा उदय डोळ्यांसमोर ठेवून झटणारी कार्यकर्त्यांची फौज प.पू. डॉक्टरांच्या भोवती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या भोवती) गोळा झाली आणि सुप्त हिंदुत्वाला प्रखर आवाज अन् भक्कम पाठबळ मिळाले. हिंदुत्वातल्या न्यूनगंडाने पलायन केले आणि हिंदू संघटनाला भक्कम आधार लाभला. अनेकानेक अडचणींतून आजही डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) सुयोग्य मार्गदर्शनाखाली सनातनची वाटचाल चालू आहे.

आजही सनातनचे सर्वच विचार सर्वांना १०० टक्के पटतील, असे नाही; पण दीर्घकालीन व्यापक हिंदुहिताच्या दृष्टीकोनातून प्रत्येक हिंदु बांधवाने येनकेन प्रकारेण सनातनशी निगडित रहाणे गरजेचे आहे. ध्येयाप्रती अभंग आणि अढळ निष्ठा, कार्याप्रती समर्पितता, अखंड दीर्घोद्योग आणि प्रत्येक हिंदूप्रती जिव्हाळा ही मूल्ये घेऊन उभे ठाकलेल्या सनातनच्या सहस्रो कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि प.पू. डॉक्टरांच्या चरणी लीन होण्याचा हा प्रसंग आहे.

सनातनला दैदीप्यमान यश आणि दीर्घ आयु लाभो, अशी इच्छा व्यक्त करतो ! – डॉ. विवेक वैद्य, सांगली

साप्ताहिक वाचनामुळे प्रतिदिनच्या धावपळीच्या जीवनातील सत्संगाची कमतरता पूर्ण होते ! – सौ. प्रणोती राघवेंद्रप्रसाद राव, पुणे

गेल्या २ वर्षांपासून मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करते आणि त्यात सांगितल्याप्रमाणे नियमित नामजपादी आध्यात्मिक उपायही करते. साप्ताहिक वाचनामुळे मन प्रसन्न होते आणि प्रतिदिनच्या धावपळीच्या जीवनात सत्संगाची असलेली कमतरता पूर्ण होते. साप्ताहिकात दिल्याप्रमाणे नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्यानेही नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि मनाला प्रसन्न वाटते. साप्ताहिकात दिल्याप्रमाणे नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्याने माझ्या मुलीच्या चिडचिड करण्याच्या स्वभावातही फरक जाणवतो. वर्धापनदिनासाठी सदिच्छा !

‘सनातन प्रभात’ साप्ताहिकाचा प्रत्येक अंक वैशिष्ट्यपूर्ण वृत्तांनी नटलेला ! – विठ्ठल व्यंकटेश मुगळखोड, साहाय्यक महाप्रबंधक (सेवानिवृत्त), नाबार्ड, मुंबई.

मी ‘सनातन प्रभात’ या साप्ताहिकाचा गेली ४ वर्षे वाचक आहे. प्रत्येक अंक वैशिष्ट्यपूर्ण वृत्तांनी नटलेला असतो. हिंदु धर्म जागृती आणि राष्ट्र रक्षणार्थ मार्गदर्शनपर विचार अगदी सोप्या पद्धतीने मांडलेले असतात. उन्नत साधक, संत प्रभृतींचे विचार, तसेच अन्य साधकांचे अनुभव माझ्यासारख्यांना पुष्कळ मोलाचे वाटतात. ते अगदी अनुकरणीय असतात ! मी कसोशीने साधना करण्याचा प्रयत्न करत आहे.

हिंदु संस्कृती आणि संस्कार वृद्धींगत करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – श्रीमती प्रभावती दळवी, मुंलुंड, मुंबई.

साप्ताहित ‘सनातन प्रभात’द्वारे अनेक संतांचे तेजस्वी विचार वाचकांपर्यंत पोचतात. ‘आध्यात्मिक उन्नतीसाठी काय करावे ?’, याचे मार्गदर्शन मिळते. तिथीप्रमाणे सण, उत्सव साजरे करण्याचे महत्त्व, नामजप भावपूर्ण करण्याचे महत्त्व, सात्त्विक वेशभूषेचे महत्त्व यांसह ‘समष्टी साधना कशी करावी ?’, याची माहिती ‘सनातन प्रभात’मधून मिळते. मानवी जीवन समृद्धपणे जगण्यासाठी साधनेची आवश्यकता आणि ती करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’मधून होत आहे. हिंदूंना जागृत करणारे हे साप्ताहिक आहे. हिंदु संस्कृती आणि संस्कार वृद्धींगत करण्याचे कार्य करणार्‍या साप्ताहिकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणारे साप्ताहिक ! – महेश नाचणेकर, मालाड, मुंबई

‘सनातन प्रभात’ हे केवळ साप्ताहिक नसून ते शारीरिक, मानसिक आणि  आध्यात्मिक असे सर्वांगीण प्रगतीसाठी बळ देणारे असे एकमेव साप्ताहिक आहे. व्यावहारिक जीवन कसे जगावे ? याची माहितीही ‘सनातन प्रभात’ मधून मिळते.

मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचते. त्यातून आपले रोजचे व्यवहार कसे आध्यात्मिक दृष्टीकोन ठेऊन करू शकतो ? हे शिकायला मिळते. सद्गुरु गजानन महाराज यांना गुरुस्थानी मानते; पण त्यांचे स्मरण करत पदोपदी सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचे विचार वाचले की वाटते, सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली तरी अपुरी आहे. विनम्रपूर्वक नमस्कार ! – सौ. मृदुला दिलीप जोशी, मिरज