‘निर्गतः धर्मः यस्मात् तत् राज्यं निधर्मी ।’, म्हणजेच ‘ज्यातून धर्म निघून गेला आहे, असे राज्य निधर्मी असते.’ सध्याच्या निधर्मी लोकशाहीत ‘धर्म’ नसल्याने अधर्माने वागणार्या भ्रष्टाचारी आणि अनीतीमान मंडळींचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल. |
- सकाळी दूधवाल्याकडून भेसळयुक्त दूध मिळते. बालकांना अमृत समजून देत असलेले दूध त्यांच्या जीवनासाठी प्रत्यक्षात विषासारखे असते.
- वाहनामध्ये पेट्रोलपंपवाले भेसळयुक्त इंधन भरतात किंवा आपल्या रकमेच्या तुलनेत न्यून (कमी) इंधन देऊन फसवणूक करतात.
- भाजी किंवा धान्य खरेदी करतांना वजनमापात फसवले जाते किंवा भेसळयुक्त सामान विकत घ्यावे लागते.
- गणेशोत्सव, दिवाळी अशा सणांच्या सुटीच्या काळात खासगी वाहनांचे भाडे वाढवून जनतेला लुटले जाते.
- पोलीस हे जनतेचे रक्षक असतांनाही साधी तक्रार नोंदवण्यासाठीही लाच द्यावी लागते किंवा त्यांची अरेरावीची करावी लागते.
- मुलांना शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच खंडणीरूपी देणगी द्यावी लागते.
- शासकीय कार्यालये, रुग्णालये, न्यायालये इत्यादी सर्वच क्षेत्रांत लाच दिल्याविना काम होत नाही. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मार्च २०१७ मधील अहवालानुसार आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांमध्ये भारत हा सर्वाधिक लाच देणारा देश आहे. भारतातील ६९ टक्के नागरिकांनी लाच दिल्याचे मान्य केले.
अशी अनेक उदाहरणे आपण प्रतिदिन अनुभवत असतो. त्या त्या क्षेत्राचा अधिक अभ्यास केल्यास या भ्रष्टाचाररूपी राक्षसाचे हात किती खोलवर पोचलेले आहेत ? हे कळू शकेल.