कोरोना महामारीच्‍या काळात मुलुंड कोविड केंद्रात १०० कोटींचा घोटाळा !

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्‍या यांचा आरोप

उद्धव ठाकरे आणि किरीट सोमय्या

मुंबई – मुलुंड येथे तात्‍पुरते कोविड केंद्र बांधण्‍यात आले होते. ‘या केंद्रात तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या नेत्‍याने १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा दावा करून ‘या घोटाळ्‍याची चौकशी करण्‍यात यावी’, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्‍या यांनी ट्‍विटरद्वारे ८ ऑगस्‍ट या दिवशी केली आहे. याविषयी मुंबई पोलीस, आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि कंपनी मंत्रालय यांच्‍याकडे तक्रार करण्‍यात आली आहे, असे त्‍यांनी सांगितले आहे.

ते म्‍हणाले की, ‘सिडकोन ओक्‍स मॅनेजमेंट कन्‍सल्‍टंसी प्रायव्‍हेट लिमिटेड आस्‍थापना’ला १ सहस्र ८५० खाटांचे रुग्‍णालय बांधण्‍याचे काम दिले. त्‍यासाठी १० कोटी ९४ लाख ३० सहस्र रुपयांचा व्‍यवहारही करण्‍यात आला. ७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२२ पर्यंत म्‍हणजे २५ मास रुग्‍णालय चालू होते. त्‍यासाठी आस्‍थापनाला प्रतिमास ३ कोटी ५९ लाख ८७ सहस्र ३८९ रुपयांचे भाडे देण्‍यात आले. याचा अर्थ भाड्याच्‍या निमित्ताने आस्‍थापनाला अनुमाने ९० कोटी रुपये देण्‍यात आले, तसेच बांधण्‍यासाठी १० कोटी अधिक देण्‍यात आले होते.