गोवा : पोर्तुगिजांच्या विरोधात लढलेल्या नौदल सैनिकाला ५२ वर्षांनंतर मिळाला न्याय !

अपंगत्व निवृत्तीवेतन चालू करण्याचा सशस्त्र सेना न्यायाधिकरणाचा आदेश

पणजी, २४ जुलै (वार्ता.) – गोव्याला पोर्तुगिजांपासून मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने राबवलेल्या ‘ऑपरेशन विजय’मध्ये नौदलाचे सैनिक तारा सिंह सहभागी झाले होते. या मोहिमेत तारा सिंह यांच्या डोक्याला गोळी लागली होती. तारा सिंह यांना अपंगत्व निवृत्तीवेतन प्रकरणात ५२ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ‘ए.एफ्.टी.’ने (आर्म्ड फोर्स ट्रिब्यूनल – सशस्त्र सेना न्यायाधिकरणाने) तारा सिंह (वय ८५ वर्षे) यांना अपंगत्व निवृत्तीवेतन चालू करण्याचा आदेश दिला आहे.

५२ वर्षांनंतर न्याय मिळालेले श्री. तारा सिंह

तारा सिंह हे मूळचे लुधियाना येथील असून ते नौदलात कार्यरत होते. तारा सिंह यांनी दुखापत निवृत्ती वेतन सूत्रावरून सशस्त्र सेना न्यायाधिकरणात याचिका प्रविष्ट केली होती. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अपंगत्व निवृत्तीवेतन देण्यात आले होते; परंतु वर्ष १९७१ मध्ये जालंधर सेना रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांचे अपंगत्व २० टक्क्यांहून अल्प असल्याचे सांगत त्यांचे अपंगत्व निवृत्तीवेतन बंद करण्यात आले होते. याला तारा सिंह यांनी सशस्त्र सेना न्यायाधिकरणात आव्हान दिले होते.

‘याचिकाकर्त्याच्या डोक्यात अजूनही गोळीचा काही भाग आहे. गोळी लागल्यानंतर ती पूर्णपणे काढून टाकल्यास त्याच्या जिवाला धोका निर्माण होणार असल्याने गोळीचा एक भाग अजूनही त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे त्यांचे अपंगत्व निवृत्तीवेतन रहित करण्याचा निर्णय चुकीचा आहे. न्यायाधिकरणाने तारा सिंह यांना अपंगत्व निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरवले. ३ मासांच्या आत तारा सिंह यांना अपंगत्व निवृत्तीवेतन चालू करावे’, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला आहे.