माणगाव खोर्यातील ५ गावांचा संपर्क तुटला !
कुडाळ – जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार चालू आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोर्यातील दुकानवाड येथील पुलावर पाणी आल्याने शिवापूर, आंजिवडे, दुकानवाड, वसोली, साकिर्डे या ५ गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या ४ दिवसांत कुडाळ तालुक्यात ४३९ मि.मी. पावसाची नोंद कुडाळ आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात झाली असून आतापर्यंत एकूण १ सहस्र ११५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
देवगड येथील शाळेतील वर्गात पाणी, तर मालवण तालुक्यातील शाळेचे छप्पर कोसळले
देवगड – तालुक्यातील ठाकूरवाडी, किंजवडे येथील प्राथमिक शाळेचे छप्पर खराब झाल्याने जोराच्या पावसात वर्गखोलीत पाणी आले. साचलेले पाणी पुसून वर्गखोली स्वच्छ करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. या घटनेचे चलचित्र (व्हिडिओ) सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाले आहे. यानंतर गावच्या सरपंचांनी तातडीने शाळेच्या छप्परावर प्लास्टिक आच्छादून वर्गखोल्यात पाणी गळणार नाही, याची व्यवस्था केली. या शाळेच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांचा निधी संमत झाला असून पावसाळ्यानंतर हे काम करण्यात येणार असल्याचे समजते.
मालवण तालुक्यातील कट्टा येथील प्राथमिक केंद्रशाळा कट्टा क्रमांक १ या शाळेची इमारत मोडकळीस आली असून याचे छप्पर ८ जुलै या दिवशी कोसळले. त्यामुळे शाळेत शिक्षण घेणार्या लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या छपराची दुरुस्ती तातडीने करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी शिवसेनेचे (ठाकरे गट) शाखाप्रमुख देवदास रेवडेकर यांनी दिली आहे.
सावंतवाडी-बेळगाव वाहतूक पाऊण घंटा ठप्प
सावंतवाडी-बेळगाव आंतरराज्य मार्गावर साबळे स्टॉप, माडखोल येथे ३ वृक्ष पडल्याने या मार्गावरील वाहतूक पाऊण घंटा ठप्प झाली होती. सनातनचे येथील साधक जीवन केसरकर यांच्यासह विलास म्हापसेकर, गणपत घाडी, सोबीन म्यॅथ्यू आदींनी कटरच्या साहाय्याने झाडे कापण्यास प्रारंभ केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठवलेल्या जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
(छायाचित्र सौजन्य : सिंधुदुर्ग 24 तास)