समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्या भीषण अपघाताचे प्रकरण
बुलढाणा – समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला होता. १ जुलैच्या रात्री झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातामागील कारण अद्याप समोर आलेले नाही; मात्र बसचालक शेख दानिश याच्या रक्ताच्या नमुन्यात ३० टक्क्यांहून अधिक ‘अल्कोहोल’ आढळले आहे. त्यामुळे ‘बसचालक मद्यधुंद असल्याने हा अपघात झाला असेल का ?’ याविषयीही अन्वेषण करण्यात येत आहे. अपघात झाल्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या विभागाने दुसर्या दिवशी दुपारी बसचालकाच्या रक्ताचे नमुने घेतले होते. त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तातील ‘अल्कोहोल’चे प्रमाण न्यून झाले असावे. अपघात घडला, त्या वेळेस चालकाच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण त्याहून अनेक पटीने अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Buldhana Bus Accident : बसचालक दानिश शेख विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; गाडी ओव्हरस्पीड, तरी चालकाला डुलकी!! https://t.co/bc40l9nIGW
— TheFocusIndia (@FocusIndianews) July 1, 2023
टायर फुटल्याने अपघात नाही !
बसचालक शेख दानिश याने प्रारंभी बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले होते. ‘प्रादेशिक परिवहन विभागाने टायर फुटल्यामुळे अपघात झाला का ?’, याचे अन्वेषण केले. त्यासाठी टायरच्या खुणा आणि नमुनेही पडताळण्यात आले; पण रस्त्यावर टायर फुटल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे ही शक्यता फेटाळण्यात आली आहे.