उदयपूरमधील ऐतिहासिक आणि सर्वांत मोठ्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

उदयपूर (राजस्थान) – येथील ऐतिहासिक आणि सर्वांत मोठ्या जगदीश मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तोकडे टी शर्ट, जीन्स, बर्मुडा, मिनी स्कर्ट, नाईट सूट आदी कपडे घालून येणार्‍यांना मंदिरात प्रवेशबंदी असणार आहे. या संदर्भातील माहिती मंदिराबाहेर भित्तीपत्रकांद्वारे लावण्यात आली आहे. हे मंदिर ४०० वर्षे जुने आहे.

१. मंदिराचे पुजारी विनोद यांनी सांगितले की, आम्ही मंदिरात येतांना तोकडे कपडे परिधान न करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही या संदर्भात मंदिराबाहेर फलक लावला आहे, त्यातून भाविकांना हिंदु संस्कृतीविषयी जागृत केले जावे आणि त्याने पुढे स्वच्छेने या नियमाचे पालन करावे. तथापि कुणी तोकडे कपडे घालून आला, तर त्याला प्रवेशापासून मात्र वंचित ठेवण्यात येणार नाही.

२. मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍या धर्मोत्सव समितीचे अध्यक्ष आणि जगन्नाथ रथयात्रा समितीचे संयोजक दिनेश मकवाना यांनी सांगितले की, जनभावना पहाता आम्ही मंदिरात तोकडे कपडे घालून येणार्‍यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाविकांना या संदर्भात आवाहन करत आहेत. मंदिरामध्ये काही पर्यटक दारू पिऊन प्रवेश करतात, अशी तक्रार आली आहे. यावरही समिती लवकरच निर्णय घेईल.

तोकडे कपडे घालून येणार्‍यांना कपडे पालटण्यासाठी पर्याय उपलब्ध !

तोकडे कपडे घालून कुणी आल्यास पुरुषांना सदरा, पायजमा, तसेच महिलांना वेगळे कपडे देण्यात येतील. कपडे पालटण्यासाठी खोल्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तोकडे कपडे घालून आलेल्यांना कपडे पालटून मंदिरात प्रवेश करता येईल.

संपादकीय भूमिका 

देशातील एकेका मंदिराने असे करत बसण्यापेक्षा देशपातळीवरच असा निर्णय सर्व मंदिरांचे विश्‍वस्त आणि मंदिर समिती यांनी घेतला पाहिजे ! यासाठी मंदिरांचा एक देशव्यापी महासंघच स्थापन करण्याची आवश्यकता आहे !