राजापूर, २७ जून (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र देशासाठी काम करत आहेत. कित्येक वर्षे सत्ता उपभोगणार्या काँग्रेसला जे जमले नाही, ते मोदी यांनी ९ वर्षांत करून दाखवले. आत्मनिर्भर आणि लोककल्याणकारी भारत देश जगासमोर आणण्याचे काम मोदी यांनी केले. त्यामुळेच मोदींच्या कष्टांना साथ देणे, हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वर्ष २०२४ ची निवडणूक जिंकून पुन्हा मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे काम घराघरांत पोचवा, असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
‘मोदी@९ महाजनसंपर्क अभियाना’चा लेखा-जोखा मांडण्यासाठी राजापूर हायस्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक सभेत नारायण राणे बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की,
१. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत आपण पाचव्या स्थानावर आलो आहोत. भारताच्या पंतप्रधानांचा जगात होणारा सन्मान आणि गौरव हा आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचा गौरव आहे.
२. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यात विविध योजना आणि मोठ्या प्रमाणावर निधी येत आहे, त्याचा योग्य विनियोग करा, या योजना घराघरांत पोहचवा.
३. राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून अनेकांना रोजगार मिळणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.
४. बाळासाहेब ठाकरे हे एकमेव होते, ते आपले गुरु आहेत त्यांनीच आपल्याला घडवले.
५. उद्धव ठाकरे आत्मपरीक्षण करायचे सोडून भाजप आणि आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत; मात्र यापुढे आम्ही ते खपवून घेणार नाही.