५०० गाड्यांचे शक्‍तीप्रदर्शन करत तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापुरात आगमन !

के. चंद्रशेखर राव

सोलापूर – ‘भारत राष्‍ट्र समिती’चे प्रमुख आणि तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव हे ५०० गाड्यांचे शक्‍तीप्रदर्शन करत २६ जूनला सोलापुरात आलेे. आषाढी एकादशीच्‍या निमित्ताने ते श्री पांडुरंगाचे दर्शन घेणार असून त्‍यांच्‍या समवेत संपूर्ण मंत्रीमंडळ आहे. सोलापूर शहरात चौकाचौकात के. चंद्रशेखर राव यांचे छायाचित्र आणि पक्षाचे गुलाबी झेंडे, गुलाबी पताका लावण्‍यात आल्‍या आहेत.

( सौजन्य महाराष्ट्र न्यूज )

हॉटेल बालाजी सरोवर येथे आल्‍यावर त्‍यांचे भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. के. चंद्रशेखर राव हे एका विशेष बसमधून प्रवास करत आहेत.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी के. चंद्रशेखर राव यांच्‍या संदर्भात एक ट्‍वीट केले आहे. ‘के. चंद्रशेखर राव हे मटण खाऊन पंढरीच्‍या वारीसाठी येत असून के. चंद्रशेखर राव यांनी वारकर्‍यांच्‍या भावनांशी खेळू नये.  पंढरपूरला येतांना १० सहस्र वेळा विचार करावा. पंढरीची वारी ही पवित्र असून अशा वागण्‍याने ती अपवित्र करू नये’, असे त्‍यात नमूद केले आहे. (वारकर्‍यांनी मनात आणले, तर राव यांना दर्शनास येण्‍यास ते बंदीही घालू शकतात ! – संपादक) या ट्‍वीट समवेत त्‍यांनी काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. (अमोल मिटकरी यांनी केलेला आरोप गंभीर असून एका राज्‍याच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी देवदर्शनाला येतांना अशी कृती करणे अशोभनीय आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

देवाला भक्‍तीभाव हवा असतो आणि वारकरी हा अत्‍यंत लीन असतो. त्‍यामुळे पंढरपूरच्‍या विठ्ठलाच्‍या दर्शनासाठी येतांना हा बडेजाव आणि शक्‍तीप्रदर्शन कशासाठी ? असा प्रश्‍न सामान्‍य नागरिकांच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !