निधर्मी सरकारकडून केरळमधील हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न ! – राकेश नेल्लिथया, केरळ

श्री. राकेश नेल्लिथया

रामनाथ देवस्थान – केरळमधील स्थिती अतिशय भयावह आहे. तेथे मुसलमान पंथियांची लोकसंख्या ३० टक्के झाली आहे. त्यामुळे काश्मीरसारखी परिस्थिती बनत चालली आहे. हिंदुत्वनिष्ठांना साम्यवादी आणि धर्मांध यांच्या समवेत धर्मनिरपेक्ष हिंदूंच्या विरोधातही लढावे लागत आहे. तेथे पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा चालायच्या. त्याला विरोध झाला. त्यामुळे त्यांनी त्या मंदिरांमध्ये भरवायला प्रारंभ केला. एक दिवस केरळ सरकारने, ‘कोणत्याही मंदिरांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा चालू देणार नाही’, असा आदेश दिला. त्यामुळे तेथे संघाच्या शाखा चालवणे कठीण बनले आहे, असे संतप्त उद्गार केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. राकेश नेल्लिथया यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सावाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर हरियाणा येथील ‘बजरंग दला’चे प्रांत सुरक्षा प्रमुख श्री. कृष्ण गुर्जर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर येथील समन्वयक कु. प्रियांका लोणे हे मान्यवर उपस्थित होते.

श्री. राकेश नेल्लिथया या वेळी पुढे म्हणाले, ‘‘केरळमध्ये धर्मांधांनी मोठ्या प्रमाणावर ‘ड्रग्ज जिहाद’ (अमली पदार्थांचा जिहाद) चालू केला आहे. या माध्यमातून ते शाळेत शिकणार्‍या मुलांना लक्ष्य करत आहेत. मागे केरळमध्ये १ लाख कोटी रुपयांची अमली पदार्थांची तस्करी पकडण्यात आली. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट हा धर्मांधांच्या कारवायांचा एक छोटासा भाग आहे. त्याहून अधिक भयानक परिस्थिती तेथे आहे. केरळमध्ये मंदिरांना धार्मिक नाही, तर सार्वजनिक ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे. या माध्यमातून निधर्मी सरकारकडून हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा केवळ एकट्या केरळचा नाही, तर संपूर्ण भारताचा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ मधील हिंदुविरोधी कारवायांची संपूर्ण देशात चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच याकडे समस्त भारतियांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.’’