हरियाणातील धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांना तोंड देणे श्रीकृष्णाच्या कृपेने शक्य ! – कृष्ण गुर्जर, प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल, हरियाणा

‘बजरंग दला’चे प्रांत सुरक्षा प्रमुख श्री. कृष्ण गुर्जर

रामनाथी, २० जून (वार्ता.) – हरियाणातील मेवातला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटले जाते. पूर्वी तेथे हिंदु मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात येत होते आणि हिंदु तरुणांच्या हत्या करण्यात येत होत्या. त्यामुळे हिंदूंनी घरदार सोडून मोठ्या प्रमाणात पलायन केले. त्या प्रकरणी स्वामी धरमदेव आणि जनरल जी.डी. बक्षी यांच्यासह एक समिती स्थापन करण्यात आली. तेव्हा गेल्या २५ वर्षांमध्ये तेथे १०२ गावे हिंदुविहिन झाली असून १२३ गावांमध्ये केवळ १०५ हिंदु कुटुंबे शिल्लक राहिली असल्याचे समोर आले. हे लक्षात आल्यानंतर बजरंग दलाने काही साहसयात्रा काढल्या. त्यामुळे हिंदूंचे धैर्य वाढले आणि त्यांनी पलायन न करता त्याविरोधात पराक्रमाने तोंड देण्याचा निर्धार केला.

राज्यात बजरंग दलाने धर्मांधांनी बांधलेल्या अवैध मशिदी आणि मजार यांचे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. यासमवेतच दलाने लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोरक्षण, दलित अन्याय निवारण आदींसाठी कार्य केले. ‘गोरक्षण करतांना गोतस्कर गोरक्षकांवर गोळीबार करतात. त्यासाठी आम्हाला शस्त्रअनुमती मिळावी’, अशी आमची सरकारकडे मागणी आहे; पण सरकार याविषयी उदासीन आहे. हे सर्व कार्य बजरंग दलाचे नाही, तर केवळ भगवान श्रीकृष्णाचे आहे. त्याच्या कृपेनेच आम्ही ते करू शकत आहोत, असे उद्गार हरियाणा येथील ‘बजरंग दला’चे प्रांत सुरक्षा प्रमुख श्री. कृष्ण गुर्जर यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर येथील समन्वयक कु. प्रियांका लोणे, केरळ येथील श्री. राकेश नेल्लिथया हे मान्यवर उपस्थित होते.