१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला आरंभ होण्यापूर्वी सभागृहातील त्रासदायक स्पंदने दूर होणे
‘१६.६.२०२३ या दिवशी सकाळी ९.३० वाजता ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला आरंभ होणार होता. मी त्या दिवशी सकाळी ८ वाजता महोत्सवाच्या सभागृहात गेलो, तेव्हा मला तेथे त्रासदायक शक्तीचा दाब जाणवत होता. त्यामुळे मी तेथे विभूती फुंकरली. हा तेजतत्त्वाच्या स्तरावरील उपाय आहे. तसेच तेथे ५ मिनिटे ध्यान लावून बसलो. तेव्हा मी केवळ माझ्या श्वासावर लक्ष ठेवले. हा निर्गुण स्तरावरील उपाय आहे. त्यानंतर तेथील त्रासदायक स्पंदने लवकर अल्प झाली. मी सभागृहात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावायला सांगितली. संतांच्या भजनांचा नादशक्तीच्या, म्हणजे आकाशतत्त्वाच्या स्तरावर लाभ होतो.
२. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या प्रसिद्धी सेवांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी महोत्सवाला आरंभ होण्यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन नामजपादी उपाय करणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे चित्रीकरण केले जाते आणि ते ‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावरून लोकांना थेट प्रक्षेपणाद्वारे (‘लाईव्ह टेलिकास्ट’द्वारे) पहायला मिळते. तसेच वक्त्यांच्या भाषणांतील २ मिनिटांची, तसेच १ मिनिटाची ठळक वक्तव्ये (रिल) ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ यांसारख्या सामाजिक माध्यमांवरून पाठवण्याची सेवाही केली जाते. या प्रसिद्धी सेवांसाठी जी यंत्रणा लागते, ती सभागृहाच्या जवळील २ खोल्यांमध्ये होती. महोत्सवाचा कार्यक्रम चालू झाल्यावर तेथील सेवांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी मी त्या दोन्ही ठिकाणी जाऊन विभूती फुंकरली आणि ५ मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप केला.
३. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या उद़्घाटनपर भाषणाच्या वेळी वाईट शक्तींनी त्यांच्या गळ्यावर, तसेच वरून आक्रमण करणे आणि त्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावे लागणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला आरंभ झाल्यावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उद़्घाटनपर भाषण करायला लागले. तेव्हा त्यांच्या आवाजात मला खरखर जाणवू लागली. मला सूक्ष्मातून जाणवले, ‘त्यांच्या गळ्यावर वाईट शक्ती आक्रमण करत आहेत. त्यांचा गळा वाईट शक्तींनी पकडून ठेवला आहे.’ आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी मी नामजप शोधला असता मला ‘निर्गुण’ हा नामजप मिळाला. मी त्यांच्यासाठी उपाय होण्यासाठी माझ्या विशुद्धचक्रापासून १ – २ सें.मी. अंतरावर उजवा तळहात आडवा ठेवून नामजप करू लागलो. सद़्गुरु डॉ. पिंगळे यांच्या ४५ मिनिटांच्या भाषणात त्यांच्या गळ्यावर पुनःपुन्हा आक्रमण होत होते. मी नामजप केल्यावर त्यांचा आवाज स्पष्ट येऊ लागायचा आणि ५ मिनिटांनी तो पुन्हा अस्पष्ट येऊ लागायचा. त्यामुळे मला त्यांच्यासाठी ४५ मिनिटांच्या भाषणाच्या कालावधीत ४ वेळा नामजप करावा लागला. त्यांच्यावर वाईट शक्ती वरूनही त्रासदायक शक्ती सोडत होत्या. इतकी सूक्ष्मातील आक्रमणे होऊनही सद़्गुरु डॉ. पिंगळे यांचे भाषण परिणामकारक झाले. ही गुरुकृपा मी अनुभवली.
४. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे थेट प्रक्षेपण दाखवणारा ‘प्रोजेक्टर’ मधमधे बंद पडणे आणि त्यासाठी १० ते १२ मिनिटे नामजप केल्यावर तो व्यवस्थित चालू होणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी पहिल्या मजल्यावर एक आणि दुसर्या मजल्यावर एक अशा २ सभागृहांची व्यवस्था केली आहे. एका सभागृहात प्रत्यक्ष कार्यक्रम होतो आणि त्याचे चित्रीकरण करून त्याचे थेट प्रक्षेपण दुसर्या सभागृहात ‘प्रोजेक्टर’द्वारे दाखवले जाते. दुपारी हा ‘प्रोजेक्टर’ काही कारण नसतांना मधेमधे बंद पडू लागला. साधकाने मला हे सांगितले. तेव्हा मला ‘प्रोजेक्टर’वर त्रासदायक शक्तीचे आवरण आल्याचे जाणवले आणि ते मला माझ्या चेहर्यावर जाणवले. (याचे अध्यात्मशास्त्र असे आहे की, घटनेतील ती वस्तू किंवा व्यक्ती हिच्याशी सूक्ष्मातून एकरूप झाल्यावर तिच्यावर त्रासदायक शक्ती कुठे आहे, हे आपल्याला आपल्या शरिरावर त्या ठिकाणी जाणवते.) ते आवरण दूर होण्यासाठी ‘महाशून्य’ हा नामजप योग्य असल्याचेही मला जाणवले. मी माझ्या चेहर्यावरील आवरण ‘महाशून्य’ हा नामजप करत काढले. त्यानंतर मी माझ्या डोळ्यांवरील आवरणही काढले. या दोन्हीसाठी मला एकूण १० ते १२ मिनिटे लागली. माझ्याकडून हे नामजपादी उपाय पूर्ण झाल्यावर लगेचच मला निरोप मिळाला, ‘आता ‘प्रोजेक्टर’ व्यवस्थित चालू झाला आहे.’
५. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची प्रसिद्धी करण्यासाठी नवीन जोडलेल्या संगणकाला ‘इंटरनेट कनेक्शन’ न मिळणे आणि त्यावर १५ मिनिटे उपाय केल्यावर, तसेच संगणकाच्या ‘केबल्स’ची जोडणी काढून ती पुन्हा जोडल्यावर ‘इंटरनेट कनेक्शन’ मिळू लागणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची प्रसिद्धी करण्यासाठी वक्त्यांची महत्त्वाची वाक्ये निवडण्याची सेवा चालू असणारा एक संगणक दुपारी काही कारणाने पालटण्यात आला आणि त्या स्थानी दुसरा संगणक बसवण्यात आला; पण त्या नवीन संगणकाला काही केल्या ‘इंटरनेट कनेक्शन’ मिळत नव्हते. मला ही अडचण कळवण्यात आली. तेव्हा मला यासाठी वाईट शक्तीच कारणीभूत असल्याचे लक्षात आले. मी त्यावर ‘निर्गुण’ हा नामजप करत माझ्या शरिरावर मला जाणवत असलेल्या त्रासदायक शक्तीच्या ठिकाणी १५ मिनिटे उपाय केले. त्यानंतर मी ‘आता त्या संगणकाला ‘इंटरनेट कनेक्शन’ येत आहे का ?’, हे बघण्यास सांगितले; पण त्या साधकाला अजूनही ‘इंटरनेट कनेक्शन’ येत नव्हते. तेव्हा मी त्याला त्या संगणकाच्या ‘केबल्स’ची जोडणी काढून ती पुन्हा जोडण्यास सांगितले. त्याप्रमाणे केल्यावर त्याला त्या संगणकाला ‘इंटरनेट कनेक्शन’ मिळू लागले.
या उदाहरणांतून लक्षात येईल की, वाईट शक्ती किती विविध प्रकारे सत्सेवेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात ! ‘हे अडथळे वाईट शक्तींमुळे आले आहेत’, हे आपली साधना असली, तरच आपल्या लक्षात येते. साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय यांच्या बळावर आपण त्या अडथळ्यांवर गुरुकृपेने मात करू शकतो.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.६.२०२३)
|