सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी देहली सेवाकेंद्रातील कु. पूनम चौधरी हिला आलेल्या अनुभूती !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी प्रसाद बनवण्यासाठी केळीवाल्याने आनंदाने ५ केळी अर्पण देणे

कु. पूनम चौधरी

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा होता. त्याच्या आदल्या दिवशी मी सेवेसाठी बाहेर गेले होते. तेव्हा रात्री ९ वाजता मला ‘उद्या गुरुदेवांसाठी प्रसाद सिद्ध करायचा आहे. तेव्हा येतांना केळी घेऊन ये’, असा एका साधकाचा भ्रमणभाष आला. सेवा करून परत येतांना आम्ही फळांच्या मंडईत गेलो. तेथे केळीवाल्याचे केवळ एकच दुकान होते. मी त्याला विचारले, ‘‘उद्या आमच्या गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा असल्यामुळे आम्हाला गुरुपूजनासाठी प्रसाद बनवायचा आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला ३ – ४ केळी अर्पण देऊ शकाल का ?’’ तो त्वरित म्हणाला, ‘‘हो. तुम्ही केळी अवश्य घेऊन जा.’’ गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला केळीवाल्याने आनंदाने ५ केळी अर्पण दिली. त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ही ‘पंचतत्त्वाची अनुभूती आहे’, असे सांगितले.

२. सद्गुरु पिंगळेकाका यांना नेहमीप्रमाणे ५ बोटांना हनुमानाचा शेंदूर लावतांना पंचतत्त्वाचीच पूजा करत असल्याचे जाणवणे

सद्गुरु पिंगळेकाका पुढे म्हणाले, ‘‘आज मी नेहमीप्रमाणे माझ्या ५ बोटांना हनुमानाचा शेंदूर लावत असतांना मी साक्षात् पंचतत्त्वांचीच पूजा करत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर माझे हृदय अन् छातीच्या उजवीकडे आणि डावीकडे शेंदूर लावतांना ‘मी त्रिगुणांची पूजा करत आहे’, असा भाव ठेवला.’’

३. प्रदक्षिणा घालत असतांना गुरुदेवांचे श्रीरामरूपात दर्शन होणे आणि दुसर्‍या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गुरुदेवांचे रथारूढ असलेले दिव्य स्वरूप पहायला मिळणे

परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मी पूजा झाल्यावर प्रदक्षिणा घालत होते. तेव्हा मला गुरुदेवांचे श्रीरामरूपात दर्शन झाले आणि ‘मी त्या रूपालाच प्रदक्षिणा घालत आहे’, असा भाव माझ्या मनात आपोआपच आला. त्याच्या दुसर्‍या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गुरुदेवांचे रथात बसलेले दिव्य स्वरूप (गुरुदेवांचे श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या समवेत रथारूढ दिव्य रूप) पाहिल्यावर मला आदल्या दिवशी प्रदक्षिणा घालतांना ‘गुरुदेवांनी मला श्रीरामरूपात दर्शन दिले होते’, याचे स्मरण झाले आणि ‘जे स्थुलातून घडणार असते, ते गुरुदेव आधीच सूक्ष्मातून घडवून आणतात’, याची मला प्रचीती आली.

४.  प्रार्थना केल्यावर गुरुदेवांच्या छायाचित्राला घातलेला पुष्पहार आपोआप हलू लागणे आणि ‘साक्षात् गुरुदेव येथे उपस्थित आहेत’, असे जाणवणे

जन्मोत्सवाच्या दिवशी दुपारी महाप्रसादाच्या वेळी सर्व साधकांचा गुरुदेवांप्रती भाव वाढावा, यासाठी सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा पाळणा लावा. भगवंताचा जन्म झाला आहे. आपण पाळणा ऐकूया.’’ श्रीरामाचा पाळणा चालू झाल्यावर मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहात मनात म्हटले, ‘गुरुदेवा, आपणच श्रीराम आहात. अंतर्बाह्य सर्वत्र केवळ आपणच आहात. हे गुरुदेव, सर्व विश्व आपल्यामध्येच सामावलेले आहे.’ त्या वेळी गुरुदेवांच्या छायाचित्राला घातलेला पुष्पहार आपोआप (टांगलेला कंदिल हलावा, त्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे) हलू लागला. तेव्हा ‘साक्षात् गुरुदेव येथे उपस्थित आहेत’, याची मला अनुभूती आली. ‘गुरुदेव आपल्या अस्तित्वाची ही प्रचीती आपण प्रत्येक क्षणी आम्हाला देत असता; परंतु आम्हीच क्षुद्र जीव ते अनुभवण्यात अल्प पडतो. गुरुदेव, मी आपल्या कृपाळू श्रीचरणी क्षमायाचना करते.’

५.  गुरुपूजनाच्या वेळी ध्यानमंदिरातील फुलांच्या गजर्‍यांनी सजवलेल्या समईची सावली भिंतीवर पडून गजर्‍यांच्या फुलांमधून दिव्य प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या लक्षात आले.

६. ध्यानमंदिरात पुष्कळ प्रमाणात दैवी सुगंध येणे आणि त्या माध्यमातून श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ उपस्थित असल्याचे जाणवणे

सद्गुरु डॉ. पिंगळेकाका म्हणाले, ‘‘गुरुदेवांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र यांची छायाचित्रे काढा.’’ त्या वेळी ध्यानमंदिरात पुष्कळ प्रमाणात दैवी सुगंध येऊ लागला. तेव्हा सद्गुरुकाकांनी सांगितले, ‘‘सगुण निर्गुण सर्व एक झाले आहे. त्यामुळे दैवी सुगंध येत आहे.’’ सद्गुरु पिंगळेकाकांनी आम्हाला ‘सुगंधाच्या रूपाने दोन्ही महालक्ष्मीच (श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ) जणू येथे आल्या आहेत’, असा भाव ठेवायला सांगितला. आम्ही सर्व साधक श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

७.‘रामनाथी आश्रमासाठी साहित्य पाठवण्याची सेवा गुरुदेवांच्या चरणी अर्पण झाली’, असे जाणवणे

जन्मोत्सवाच्या दिवशी रामनाथी आश्रमासाठी काही साहित्य पाठवायचे होते. त्या साहित्याची खरेदी करणे चालू होते. आश्रमातील सेवेसमवेतच हीसुद्धा सेवा करायची होती. त्यामुळे मला ताण आला होता. साहित्य खरेदीची सर्व सेवा पूर्ण झाली. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, या सेवेमध्ये माझ्याकडून विस्मरणाच्या काही चुका झाल्या असतील, तर त्या माझ्या लक्षात आणून द्या.’ प्रार्थना करत असतांना मला केव्हा झोप लागली, ते कळलेच नाही. रात्री माझ्या स्वप्नात गुरुदेव आले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. तेव्हा ‘गुरुदेवांच्या चरणी ही माझी लहानशी सेवा अर्पण झाली’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

‘हे गुरुदेव, आपल्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपणच मला आपल्या अनुसंधानात ठेवले आणि मला अशा सुंदर अनुभूती देऊन सतत भावस्थितीत ठेवले. मला या भावस्थितीत ठेवल्याबद्दल मी आपल्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (२३.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक