स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रखर विचार युवा पिढीपर्यंत पोचवणे हे आपले दायित्व ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र

मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

श्री. रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र

मॉरिशस – स्वातंत्र्यवीर सावरकर हे मानवरूपी कल्पवृक्ष होते. ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळ, मुळे उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर कल्पवृक्ष होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी डावीकडून मंत्री रवींद्र चव्हाण (मध्यभागी) आणि (उजवीकडील) मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन

स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, अधिवक्ता, कवी, लेखक, साहित्यिक, तत्त्वचिंतक, समाजसुधारक, दूरदृष्टी असलेले व्यक्तीमत्त्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढीपर्यंत पोचवणे हे आपले दायित्व आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी २८ मे या दिवशी मॉरिशस येथे केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे चालू रहावे, यासाठी मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्‍व संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मॉरिशस येथे सावरकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. २८ मे या दिवशी मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्री चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.

या वेळी मंत्री चव्हाण पुढे म्हणाले…

१. मॉरिशसमधील मराठी बंधू-भगिनींनी २०० वर्षे आपली हिंदु संस्कृती जपली आहे. या देशात मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्य त्यांनी केले आहे. इथल्या सरकारच्या विविध मंत्रालयांना भेटी देत असतांना वर्ष २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसला विशेष मित्रराष्ट्राचा दर्जा दिल्याने भारताचे आणि मॉरीशसचे भावबंध अजून घट्ट झाल्याचे जाणवले.

२. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ऋणानुबंध वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. त्यातूनच वीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्राच्या वतीने आम्ही आज भेट दिला आहे. वीर सावरकरांच्या विचारांची ऊर्जा मॉरिशसच्या समस्त हिंदु आणि मराठी बांधवांना मिळत राहील.

या प्रसंगी मॉरिशस हाऊसिंग आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद बब्बीआ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आणि मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे मुख्य निर्माते अर्जुन पुतलाजी, मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितीन बाप्पू, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे अध्यक्ष आणि सी.एस्.के. असंत गोविंद आदी मान्यवर उपस्थित होते.