प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

पुणे – विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्य यांवर आधारित प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच ‘यापुढचे शिक्षण हे मराठीतून असणार, त्यामुळे पालकांनी इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा’, अशी भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.


खासगी शाळांमध्ये शिकवले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात; मात्र इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीच्या आहारी जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षकांच्या भरती संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षकभरती प्रक्रियेला असणारी स्थगिती उठल्यानंतर तातडीने शिक्षकभरती पूर्ण केली जाईल. राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेला शिक्षक मिळेल, असेही त्यांनी सांगितले.