भोसरी (पुणे) येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाची दुरवस्था 

प्रतिदिन टँकरने पाणीपुरवठा; भिंती उंदीर, घुशी यांनी पोखरल्या

नाट्यगृहातील आसंद्यांची मोडतोड झाली आहे.

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ रुजावी; म्हणून ५ नाट्यगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह एप्रिल महिन्यापासून विविध कार्यक्रमांसाठी आरक्षित झाले आहे. इतर नाट्यगृहांपेक्षा अधिक उत्पन्न देणार्‍या या नाट्यगृहाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नाट्यगृहाची दुरवस्था होऊन इतर सुविधा मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

‘बालरंगभूमी परिषदे’च्या अध्यक्षा गौरी लोंढे म्हणाल्या, ‘‘या नाट्यगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे त्याचा परिणाम सांस्कृतिक कार्यक्रमांवर होत आहे. प्रायोगिक, हौशी आणि व्यावसायिक नाटके, लावणीचे कार्यक्रम येथे साजरे होण्याचे प्रमाण अल्प आहे. या नाट्यगृहाची देखभाल प्रशासनाने नियमितपणे करणे आवश्यक आहे.’’

उपअभियंता शैलेंद्र चव्हाण म्हणाले, ‘‘नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता आहे. ही कामे लवकर हाती घेण्याचा प्रयत्न आहे. नाट्यगृहांच्या रंगरंगोटीसह भौतिक सुविधांतील असुविधा दूर करण्यासाठी विलंब लागेल.’’

नाट्यगृहातील समस्या

या नाट्यगृहाच्या पडद्याची दुरवस्था झाली आहे. मंचावरील पडदे जुनाट झाले असून भिंतीवरील रंग उडाला आहे, तर काही ठिकाणी पापुद्रे आले आहेत. भिंतींना उंदीर, घुशी यांनी बिळे पाडून ठिकठिकाणी भिंती कमकुवत झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे नळ खराब झाले असून स्वच्छतागृहातील नळ निकामी अवस्थेत तसेच पडून आहेत. स्वच्छतागृहातील आरसे निखळून पडलेले आहेत. नाट्यगृहातील प्रेक्षकांसाठी बसण्यासाठीच्या आसंद्यांची मोडतोड झाली असून त्याचे कुशन बाहेर आलेले आहे.

नाट्यगृहास टँकरने पाणीपुरवठा

नाट्यगृहातील जलवाहिन्या नादुरूस्त झाल्या असून, पाणी साठवण क्षमता अल्प झाली आहे. त्यामुळे प्रतिदिन टँकरने पाणीपुरवठा केला जातो. कार्यक्रमासाठी येणार्‍या प्रेक्षकांना तो पाणीपुरवठा अपुरा पडतो. पाणी अल्प असल्यामुळे स्वच्छतागृह स्वच्छ करण्यास अडचणी येतात. त्यामुळे तेथे दुर्गंधी येत असते. नाट्यगृहातील वातानुकूल यंत्रणेसाठी पाणी लागते; परंतु पाणीपुरवठा अल्प होत असल्याने वातानुकूलिन यंत्रणेत वारंवार बिघाड होऊन त्या बंद पडण्याच्या घटनाही घडत आहेत.

संपादकीय भूमिका

एक नाट्यगृह नीट सांभाळू न शकणारे प्रशासन शहर कसे सांभाळणार ?

नाट्यगृहाच्या देखभालीचे दायित्व कुणावर आहे ? त्याविषयीचे काही धोरण ठरलेले आहे कि नाही ? 

या दुरवस्थेला उत्तरदायी असणार्‍यांवर महापालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करणे आवश्यक !