पुणे महापालिकेकडून शहरातील विनाअनुमती फलकधारकांवर गुन्हे नोंद होणार ?

  • पोलिसांना दिली ११० फलकधारकांच्या नावांची सूची
  • पोलिसांकडून गुन्हे नोंद करण्यास विलंब होतो – महापालिकेचा आरोप

पुणे – शहरातील विनाअनुमती लावण्यात आलेले फलक आणि ‘होर्डिंग्ज’ (विज्ञापन फलक) लावणार्‍यांवर गुन्हे नोंद करावेत, यासाठी पोलिसांना ११० फलकधारकांची नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बी.पी. पृथ्वीराज यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ अभियाना’अंतर्गत ‘भारत सर्वंकष स्वच्छता मोहिमे’साठी एकाच वेळी सर्व विभागातील कर्मचारी रस्त्यावर येऊन स्वच्छता करतात. त्यातून अतिक्रमण हटवणे, विनाअनुमती फलकांवर कारवाई केली जाते. कारवाई केल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी खांबांवर आणि चौकांमध्ये पुन्हा विज्ञापन फलक लावले जातात. (असे होऊ नये यासाठी महापालिका काय करणार ? हे सांगणे आवश्यक आहे ! – संपादक)

महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये विनाअनुमती विज्ञापन फलक लावल्याबद्दल संबंधितांवर विद्रूपीकरणाचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांना पत्रे दिली आहेत; मात्र पोलिसांकडून गुन्हे नोंद करण्यास विलंब होत आहे. (पोलिसांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही ? का ते त्यांची पाठराखण करतात ? हे जनतेला कळले पाहिजे ! – संपादक) पोलिसांनी महापालिकेच्या पत्रानुसार संबंधितांवर तातडीने गुन्हे नोंद करावेत, यासाठी पोलीस आयुक्तांसमवेत पत्रव्यवहार चालू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त बी.पी. पृथ्वीराज यांनी दिली.