संशयितांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन !

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण !

खंडणी प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड (मध्यभागी)

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पसार असलेल्या ३ आरोपींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी गावातील पाझर तलावात उतरून ‘जलसमाधी आंदोलन’ केले. संतोष देशमुख यांची हत्या होऊन २२ दिवस उलटले, तरी अद्यापही ३ पसार आरोपींना अटक झालेली नाही, त्यामुळे ग्रामस्थ हे आंदोलन करत आहेत. (अशी मागणी आणि आंदोलन का करावे लागते ? पोलीस कारवाई केव्हा करणार ? – संपादक) आंदोलनाच्या ठिकाणी तहसीलदारांनी जाऊन ‘लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग काम करत आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे’, अशी विनंती आंदोलकांना केली; मात्र जलसमाधी आंदोलनावर आंदोलक ठाम होते.

खंडणी प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड यांना रात्री कारागृहात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना अर्धा घंटा ऑक्सिजन लावण्यात आला होता. रात्री  केवळ अर्धी पोळी खाल्ली असून १ जानेवारीला सकाळी अल्पाहार केला नाही. अशी माहिती काही प्रसिद्धीमाध्यमांनी दिली आहे.

वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा नोंद का नाही ? – ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षकांना प्रश्न

या प्रकरणात काही महिलांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या आंदोलनात गावातील तरुणही सहभागी झाले होते. या प्रसंगी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करतांना ग्रामस्थांनी ‘गेले २२ दिवस वाल्मिक कराडला अटक का करण्यात आली नाही ? वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा नोंद का नाही ? पोलीस अन्वेषण कधी पूर्ण करणार आहेत ? यांसह अनेक प्रश्नांचा भडीमार केला. या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत पत्रकारांना माहिती देतांना म्हणाले, ‘‘आमची सर्व आंदोलकांशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांना तलावातून बाहेर काढले आहे. लवकरात लवकर पसार आरोपींना अटक करू, असे आश्वासन आम्ही त्यांना दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष पथकाची नेमणूक राज्य सरकारने केली असून बसवराज तेली या अधिकार्‍यांची पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे.’’


पसार संतोष घुलेसह तिघांचा राज्य गुन्हे शाखेकडून शोध चालू !

बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप पसार आहेत. या सर्वांचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध चालू आहे. या सर्वांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.


खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांना केज न्यायालयाकडून १४ दिवस कोठडी !

बीड – वाल्मिक कराड याच्यावर पवनऊर्जा क्षेत्रातील आस्थापन ‘अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’च्या प्रकल्प अधिकार्‍यांकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद असून त्यांना ३१ डिसेंबरला पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे शरण आल्यावर अटक करण्यात आली. या प्रकरणी कराड यांना केज येथील न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना १४ दिवसांची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) कोठडी देण्यात आली. खंडणी प्रकरणात कराड यांच्यासह विष्णु चाटे, सुदर्शन घुले यांच्यावरही गुन्हा नोंद आहे.

कराड यांना न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना न्यायाधिशांनी ‘पोलिसांच्या  विरोधात काही तक्रार आहे का ?’, असे विचारल्यावर त्यांनी ‘नाही’ म्हणून सांगितले. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता एस्.एस्. शिंदे यांनी पोलिसांची बाजू मांडली. कराड यांना न्यायालयात उपस्थित करतांना दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती; मात्र पोलिसांनी कारवाई करण्याची चेतावणी देऊन सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयासमोरून हुसकावून लावले. यानंतर पोलिसांनी केज न्यायालय आणि केज पोलीस ठाण्यासमोरील रस्ता पूर्णत: रिकामा केला.

खंडणी प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड यांना रात्री कारागृहात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना अर्धा घंटा ऑक्सिजन लावण्यात आला होता. रात्री  केवळ अर्धी पोळी खाल्ली असून १ जानेवारीला सकाळी अल्पाहार केला नाही. अशी माहिती काही प्रसिद्धीमाध्यमांनी दिली आहे.