प्रभु श्रीरामचंद्र हे जगाच्या न्यायाचे रक्षक ! – ह.भ.प. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार

सोलापूर येथे श्रीराम कथा कीर्तनमाला उत्साहात !

ह.भ.प. चारुदत्त आफळे

सोलापूर – शत्रूला संपवण्यासाठी सर्वप्रथम शत्रूच्या समर्थकांना नष्ट करावे लागते, हे नितीतत्त्व प्रभु श्रीरामचंद्रांनी समाजासमोर ठेवले. प्रभु श्रीरामचंद्र हे जगाच्या न्यायाचे रक्षक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले. अखिल भारत पद्मशाली पुरोहित वैदिक ज्ञानपीठम्, पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळ, श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कुचन प्रशालेत नुकत्याच आयोजित ‘श्रीराम कथा’ कीर्तनमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी प्रभु श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी सर्वश्री संजय साळुंखे, पुरुषोत्तम उडता, आकाश शिरते, संजय होमकर, अधिवक्ता संदीप संगा, श्रीनिवास संगा, सूर्यकांत जिंदम, अनिल वंगारी, श्वेता मंचाल, दादासाहेब सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीराम कथेच्या कालावधीत ह.भ.प.चारुदत्त आफळे बुवा यांनी मांडलेली सूत्रे

१. मारुतिराया हे सेवाभावाचे प्रतिक आहेत. ज्याच्याकडे सत्ता, श्रीमंती असते त्याची सेवा अनेकजण करतात; परंतु सज्जन संकटात असतांना त्यांना सेवाभावाने साहाय्य करणे महत्त्वाचे आहे. हे महान कार्य हनुमंतरायांनी केले. अधर्माने वागणार्‍या वालीला त्याच्याच पद्धतीने धडा शिकवून आदर्श प्रस्थापित केला.

२. ‘लव्ह जिहाद’ हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. याविषयी प्रत्येक हिंदूने जागरूक असणे आवश्यक आहे. अशा संकटांवर मात करण्याची शिकवणही रामायणात आहे.

३. रामायणाचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रात प्रभु श्रीरामचंद्रांच्या जीवनमूल्यांचा प्रभाव आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण !

कीर्तनमालेच्या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत या सादरीकरणाला प्रतिसाद दिला.