‘हिंदुफोबिया’ची (हिंदुद्वेषाची) भयावह स्थिती !

जगात विविध ठिकाणांहून कानावर येणार्‍या ‘हिंदुफोबिया’ म्हणजेच हिंदुद्वेष आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटना, ही गंभीर अन् चिंतेची गोष्ट आहे. अनेक देशांमध्ये हिंदु व्यक्ती, प्रतीके, मंदिरे इत्यादींवर होणारी आक्रमणे, ही नित्याचीच झाली आहेत. ब्रिटनमधील ‘द हेन्री जॅक्सन सोसायटी’ने सिद्ध केलेल्या‘ॲंटी हिंदू हेट इन स्कूल्स’ या अहवालामुळे हिंदु समाजावरील आक्रमणे समोर आली. या अहवालात ब्रिटनच्या शाळांमध्ये हिंदूंविषयी द्वेष पसरवला जात असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. देवतांची पूजा, गोपूजन, हिंदूंमधील जातीव्यवस्था आदी सूत्रांवरून हिंदु मुलांना चिडवले वा अपमानित केले जाते. मुसलमान तर हिंदु मलांना ‘काफिर’ म्हणूनच संबोधतात.

या अभ्यासाच्या अंतर्गत ९९८ हिंदु पालकांशी चर्चा करून त्यांची मते नोंदवण्यात आली. ५१ टक्के पालकांनी सांगितले की, त्यांच्या मुलांना हिंदुद्वेषाचा सामना करावा लागला आहे. १९ टक्के पालकांनी ‘शैक्षणिक संस्था या प्रकाराची नोंद घेऊन पुढील कारवाई करतील’, अशी अपेक्षा व्यक्त केली. ब्रिटनमध्ये हिंदुद्वेषावरील अभ्यासावर आधारित हा पहिलाच अहवाल आहे. ‘हिंदुविरोधी दुष्प्रचार हे हिंदुद्वेषाचे प्रमुख कारण आहे’, असे त्या अहवालात नमूद करण्यात आले होते.

१. अहवालातील प्रमुख सूत्रे

अ. ‘शाकाहारी असल्याची खिल्ली उडवून एका मुलीवर गोमांस फेकण्यात आले आणि ‘तुम्ही इस्लामचा स्वीकार केला, तर आम्ही तुझा छळ करणे थांबवू’, असे तिला धमकावण्यात आले.

आ. एका विद्यार्थ्याला असे सांगण्यात आले की, हिंदु धर्माचा अभ्यास करणे मूर्खपणाचे आहे; कारण तो ३३ कोटी देवांसह हत्ती, माकडे, साप, उंदीर आणि निर्जीव मूर्ती यांची पूजा करतो.

इ. ‘आमचा येशू तुमच्या सर्व देवांना नरकात पाठवेल’, असे एका ख्रिस्ती व्यक्तीने एका हिंदु मुलाला धमकावून सांगितले.

ई. हिंदु धर्मात पवित्र समजल्या जाणार्‍या ‘स्वस्तिक’ या चिन्हाची हिटलरच्या चिन्हाशी तुलना करून हिंदु मुलांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत.

उ. अहवालात हिंदु मुलांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्माविरोधात टीका-टिप्पणी केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे मुसलमान किंवा ख्रिस्ती विद्यार्थी आणि शिक्षक कुठल्या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल असे करत असतील, असा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही.

२. गोरे वर्चस्ववादी आणि मुसलमान हे हिंदुविरोधी हिंसाचारात आघाडीवर

वास्तविक युरोप-अमेरिकेसह अनेक देशांमध्ये सध्या चालू असलेली हिंदूंविरुद्धची मोहीम आणि हिंसाचाराचा, म्हणजेच ‘हिंदुफोबिया’चा एक छोटासा अंश या अहवालात प्रकट झाला आहे. धर्म आणि वांशिक द्वेषाविषयी संशोधन करणार्‍या अमेरिकन संस्थेच्या ‘नेटवर्क कॉन्टेजिअन रिसर्च इन्स्टिट्यूट’ने अभ्यासात सांगितले आहे की, गेल्या काही वर्षांत हिंदुविरोधी टिप्पण्यांमध्ये १ सहस्र टक्क्यांनी वाढ झाली आहे. गोरे वर्चस्ववादी आणि मुसलमान हे हिंदुविरोधी प्रचार अन् हिंसाचार यांत आघाडीवर आहेत.

३. हिंदूंच्या विरोधात द्वेष पसरवण्यात पाकिस्तान, अमेरिका आणि ब्रिटन आघाडीवर

या अहवालानुसार हिंदु आणि भारतीय यांच्याविरुद्ध द्वेष पसरवण्यात पाकिस्तानी आघाडीवर आहेत. पाकिस्तानातून हिंदूंच्या विरोधात प्रतिदिन सहस्रो द्वेषपूर्ण ‘ट्वीट’ केले जातात. अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांचा एक गट प्रचाराचा एक भाग म्हणून या प्रकारांना खतपाणी घालतो.  ब्रिटनमधील मजूर पक्षाचे नेतेही हिंदु धर्म आणि त्यातील प्रथा-परंपरांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानतात.

४. अन्य धर्मियांकडून हिंदूंना दिली जाणारी वागणूक आणि त्यांचा अपसमज

इतर देशांची समस्या ही आहे की, ते हिंदु धर्म आणि हिंदु समाजाचा त्यांच्या धर्माच्या दृष्टीकोनातून अर्थ लावतात. ब्रिटीश अध्ययनातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी असे मत नोंदवले की, त्यांच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदु धर्माची थट्टा, मस्करी आणि खिल्ली उडवण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये हिंदु धर्म आणि हिंदू यांच्याविषयी अपसमज निर्माण होतात. अब्राहमिक (अब्राहमला मानणारे ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम पंथ) धर्माच्या दृष्टीकोनातून हिंदु धर्माची व्याख्याच होऊ शकत नाही; पण समस्या एवढीच असती, तर त्यांना अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या हिंदु संघटना, विविध पंथ, संप्रदाय, योग, अध्यात्म, तत्त्वज्ञान इत्यादींवर काम करणार्‍या संस्थांमध्ये रस घेऊन हिंदु धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करता आला असता. ख्रिस्त्यांच्या वर्तणुकीविषयी काय सांगावे ? भारतासह आशिया आणि आफ्रिका यांवर राज्य करणार्‍या ब्रिटिशांना व्हाईट्स मेन्स बर्डन यांनी जे तत्त्वज्ञान सांगितले, त्यानुसार ‘या देशांतील लोकांना सुसंस्कृत करणे, हे आपले उत्तरदायित्व आहे आणि म्हणूनच आपण त्यांच्यावर राज्य करत आहोत’, असा त्यांचा समज आहे.

ही श्रेष्ठ सभ्यता आणि संस्कृती यांची जाणीव अद्याप संपलेली नाही. या कारणास्तव या देशांमध्येही आपण धार्मिक-सांस्कृतिक वर्चस्ववादी गट आणि ख्रिस्त्यांचा अतिरेक पहात आहोत. यावरून मुसलमानांचा दृष्टीकोन स्पष्ट होऊ शकत नाही. इस्लामी कट्टरतावाद हा एक धार्मिक वर्चस्ववादी विश्वास आहे, जो मानतो की, ‘इस्लाम हा एकमेव धर्म असून इतर धर्मांचे अस्तित्व इस्लामविरोधी आहे.’ त्यामुळे प्रत्येक धर्माला ते लक्ष्य करत असतात. ‘भारताबाहेरील हिंदु आपली शिकार आहे’, असे त्यांना वाटते; कारण हिंदु बहुसंख्य असलेला दुसरा देश जगाच्या पाठीवर नाही.

५. जगभर हिंदू आणि भारत यांचा वाढता प्रभाव अन् त्यामुळे हिंदूंचा वाढत असलेला आत्मविश्वास

ही परिस्थिती पूर्वी असली, तरी अलिकडच्या वर्षांत हिंदूंविरुद्ध दुष्प्रचार, द्वेष आणि हिंसाचार यांत वाढ झाली आहे; पण का ? येत्या काळात हिंदु संघटनांना जगभरात व्यापक स्तरावर काम करावे लागणार आहे. जिथे जिथे हिंदु वास्तव्याला आहेत, तिथे ते अनेक सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, बौद्धिक सर्जनशील उपक्रम राबवत आहेत. त्यांचा प्रभावही वाढला आहे. जगात भारतीय वंशाचे अनुमाने ३५ लाख लोक आहेत, ज्यामध्ये हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे. हिंदू अनेक देशांमध्ये केवळ उच्च पदांवरच नव्हे, तर व्यवसाय, विज्ञान, संस्कृती, शैक्षणिक, प्रसिद्धीमाध्यमे इत्यादींमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी छोट्या देशांतील भारतीय वंशाच्या समूहांना संबोधित केले आणि त्यांच्यामध्ये आपली संस्कृती अन् सभ्यता यांविषयी अभिमानाची भावना आणि भारताविषयी भावनिक ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक हिंदु संघटना तेथे प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या सभांचा व्यापक परिणाम बघता आला. आपल्या सण-धार्मिक उत्सवांपासून भारताच्या स्वातंत्र्यदिनापर्यंतचे कार्यक्रम विविध देशांमध्ये थाटामाटात साजरे केले जातात. आताशी भारतीय आणि भारतवंशीय हिंदु निःसंकोचपणे कुणाचीही भीडभाड न बाळगता स्वतःची संस्कृती, सभ्यता अन् अध्यात्म यांविषयी बोलू लागले आहेत. भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रभावामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

६. ‘हिंदुफोबिया’ कुणी वाढवला ?

कोणताही समाज जागा झाला, तर स्वत:ला श्रेष्ठ समजणार्‍यांना अडचणी येणे स्वाभाविकच आहे. हिंदु त्वेषाने प्रतिक्रिया देत असले, तरी कोणत्याही धर्म, पंथ किंवा समुदायाविरुद्ध द्वेष वा हिंसाचार करणे हिंदूंच्या स्वभावात नाही. तथापि संघ आणि मोदी सरकारची विचारधारा ‘इतर धर्मांना चिरडून टाकणार आहे, मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, त्यांच्या धार्मिक कार्यात अडथळे आणले जात आहेत’, असे सांगून पाकिस्तान आणि त्यातून प्रभावित झालेल्या मुसलमानांच्या गटाने ‘हिंदुफोबिया’ वाढवला आहे.

अशी भाषा इंग्लंडच्या मशिदींतून बोलली जाणे, ही आता सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. अमेरिका आणि इतर देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. त्याला सामोरे कसे जायचे ? हा प्रश्न आहे. भारताने गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांत दोनदा हे सूत्र उपस्थित केले होते. त्यामुळे हा विषय संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपर्यंत पोचला असून ‘जागतिक संघटनेने आपल्या चर्चेत आणि प्रस्तावांमध्ये त्याचा समावेश करावा’, असा भारताचा प्रयत्न आहे.

७. जागृत हिंदू आणि हिंदु संघटना यांनी चालू केलेल्या मोहिमेचा परिणाम

‘हिंदुफोबिया’ पसरवण्याचे प्रयत्न चालू झाल्यानंतर जागृत हिंदू आणि हिंदु संघटना यांनीही समांतर सकारात्मक मोहीम चालू केली आहे. याचा परिणाम म्हणजे गेल्या मासात अमेरिकेतील जॉर्जियामध्ये ‘हिंदुफोबिया’च्या विरोधात ठराव संमत करण्यात आला. या ठरावात केवळ हिंदु धर्म, सभ्यता आणि संस्कृती यांचे सत्यच समोर आलेले नसून अमेरिकेतील हिंदूंचे योगदान मान्य करण्यात आले आहे. हिंदुफोबिया पसरवणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. हिंदु संघटनांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

८. सक्रीय हिंदूंनी सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत करावयाचे प्रयत्न

या सर्वांचा निष्कर्ष असा की, प्रतिकुल परिस्थितीला संधी मानून हिंदूंनी त्यांचा धर्म, संस्कृती, भारतीय राष्ट्रवादाची संकल्पना इत्यादींचा व्यापक प्रचार केला पाहिजे. जगभरातील हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला नाही, तर या सांस्कृतिक आणि शारीरिक आक्रमणांचा केवळ सामनाच केला जाणार नाही, तर हिंदु धर्म, सभ्यता अन् संस्कृती यांची स्वीकारार्हताही वाढवता येणार नाही. हिंदु धर्म इतर कोणत्याही धर्माशी संघर्ष करत नाही; कारण तो त्याचा स्वभावच नाही. इस्लामी आतंकवाद्यांनी त्यांच्या भूमिकेने संपूर्ण जगाला घाबरवले आहे. ब्रिटनमध्येच अनेक ख्रिस्त्यांनी कारागृहांत असलेल्या ख्रिस्त्यांना इस्लामी आक्रमणांपासून वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई चालू केली आहे. अनेक देशांत हीच परिस्थिती आहे. अशात हिंदु समाज स्वतःचा धर्म आणि संस्कृती यांच्या आधारावर अशी भूमिका निभावू शकतो, ज्यामुळे सर्वधर्मसमभावासारखे आचरण जागतिक समुदाय अंगीकारण्याची शक्यता बळकट होईल.’

– श्री. अवधेश कुमार

(साभार : ‘हिंदी भारतवाणी’ आणि ‘तरुण भारत’, १६.५.२०२३)