स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रवाद आणि संस्कृती यांविषयीचे विचार भारतातील धर्म, कला आणि भाषा नष्ट करून अस्मितेवर घाला घालणारे मुसलमान अन् ख्रिस्ती आक्रमणकर्ते !

सावरकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने…

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा परंपरेचा अभिमान असणे

‘पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा खराखुरा पूर्वजांच्या परंपरेचा अभिमान बाळगणे होय. पूर्वजांच्या अज्ञानाच्या परंपरेचा अभिमान बाळगणे केव्हाही इष्ट नाही. पूर्वजांचे ज्ञान काही वेळा सध्याच्या वाढत्या ज्ञानाप्रमाणे अज्ञान ठरले असेल, तर ते स्वीकारता कामा नये, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सूत्र !

२. राष्ट्रवादाची पुढची पायरी आंतरराष्ट्रवाद असून हिंदु राष्ट्रवादाची पुढची पायरी मानवतावाद असणे

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रवादी होते; पण त्यांनी आंतर्राष्ट्रवादाचा कधी विचारच केला नाही का ?’, असा प्रश्न बर्‍याच वेळा उपस्थित होतो. ‘राष्ट्रवादाची पुढची पायरी आंतर्राष्ट्रवाद आहे. हिंदु राष्ट्रवादाची पुढची पायरी मानवतावाद आहे’, असे सावरकर म्हणतात; पण ‘जगावर दुसर्‍या ग्रहावरून आक्रमण झाल्याविना आंतरराष्ट्रवाद येणार नाही’, असे त्यांचे निश्चित मत आहे. याचे कारण समान दुःख आल्याविना जगाचे एक राष्ट्र कधीही होणार नाही. आंतरराष्ट्रवादाची भाषा बोलणारी राष्ट्रे दुसर्‍या महायुद्धानंतर आणि गेल्या २ – ३ दशकांत अधिक कट्टर राष्ट्रवादी बनलेली आहेत.

३. गोपालनाचे महत्त्व पटवून देणे

‘गोपालन झाले पाहिजे’, हे सावरकर यांच्या गायीसंबंधातील विवेचनाचे मुख्य सूत्र होय ! गायीचाही विचार त्यांनी बुद्धीवादाच्या दृष्टीकोनातून केला.

४. उद्योगालयाच्या लाभाचा वाटा कामगारांना मिळतो; पण तोटा झाल्यास त्याचाही वाटा कामगारांनी उचलला पाहिजे !

उद्योगालयाला (कारखान्याला) पैशांप्रमाणे कामगारांच्या श्रमाचेही भांडवल लागते, हे तत्त्व सावरकर यांना मान्य आहे. त्यामुळे कामगारांचे प्रतिनिधी उद्योगालयाच्या संचालक मंडळावर असतात. उद्योगालयाला लाभ होतो, तेव्हा त्याचा वाटा लाभांशाच्या रूपाने कामगारांना मिळतो; पण तोटा झाला, तर त्याचाही वाटा कामगारांनी उचलला पाहिजे आणि उद्योगालयाचे पर्यायाने राष्ट्राचे हित साधले पाहिजे.

५. ‘परकियांची आक्रमणे ही केवळ राजकीय नसून सांस्कृतिक आक्रमणे होती’, असे सावरकर यांनी सांगणे

भारतावर यवन, ग्रीक, शक, हूण, मुसलमान आणि इंग्रज यांनी जी आक्रमणे केली, त्यांपैकी पहिली ४ आक्रमणे ही केवळ राजकीय होती. ‘उरलेली २ म्हणजे मुसलमान आणि इंग्रज यांची आक्रमणे ही केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमणेही होती’, हा मोलाचा सिद्धांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात मांडला. मुसलमान आणि इंग्रज या आक्रमकांना भारतात राजकीय सत्ता राबवतांना भारतातील संस्कृती, धर्म, कला अन् भाषा इत्यादी समाजाची अस्मिता नष्ट करावयाची होती. समाजातील दोषांचा लाभ उठवून हिंदूंना बाटवून हिंदूंची संख्या अल्प करायची आणि आपल्या समाजाची संख्या वाढवायची, असा उपक्रम मुसलमान अन् इंग्रज म्हणजेच ख्रिस्ती यांनी चालू केला. एका विचारवंताने ख्रिस्त्यांच्या या उपक्रमाचे मार्मिक वर्णन चांगल्या पद्धतीने केले आहे. ‘ख्रिस्ती येथे आले, तेव्हा त्यांच्या हातात बायबल नि आमच्या हातात सत्ता होती. आता आमच्या हातात बायबल नि ख्रिस्त्यांच्या हातात सत्ता आहे.’

– प्रभाकर नी. नवरे (स्वातंत्र्यवीर, दिवाळी २०११)

दमदाटी करणार्‍या मौलाना शौकत अलींना ‘अफझलखानवधा’चे स्मरण देऊन निरुत्तर करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

सप्टेंबर १९२४ मध्ये विख्यात मुसलमान नेते मौलाना शौकत अली यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शुद्धीकरण चळवळ बंद करण्यास सांगितली. मौलाना अलींच्या या अनाहूत समादेशाला पुढील उत्तर देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निरुत्तर केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर : प्रथम तुम्ही हिंदूंचे धर्मांतर थांबवावे.

मौलाना (चिडून) : तुम्ही मुसलमानांचे म्हणणे ऐकले नाही, तर जगात अनेक इस्लामी देश आहेत, तेथे जाण्यासाठी ते भाग पडतील.

स्वातंत्र्यवीर सावरकर : प्रतिदिन ‘फ्रंटियर मेल’ भारतातून बाहेर जाते. आपण प्रतिक्षा का करत आहात ? आपण लगेचच आपले चंबूगबाळे बांधून भारतातून बाहेर निघून जावे.

मौलाना (पुष्कळ चिडून) : तुम्ही माझ्यापेक्षा बुटके आहात. मी तुम्हाला चिरडून टाकीन.

स्वातंत्र्यवीर सावरकर : मी तुमचे आव्हान स्वीकारतो; पण छत्रपती शिवाजी महाराजही अफझलखानासमोर अतिशय बुटके होते आणि त्या लहान उंचीच्या मराठ्याने पठाणाचे पोट फाडले होते, हे तुम्हाला ज्ञात नाही का ?

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी कारागृहात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासावर आधारित ‘हिंदुपदपादशाही’ या नावाने ग्रंथ लिहिला.’

– डॉ. हरवंश लाल ओबेराय (‘मासिक सावरकर टाइम्स’, मे २०११)