मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या आंबा बागायतदार घेणार भेट
रत्नागिरी – यावर्षी आंब्याचे उत्पादन अतीशय अल्प आहे. मिळालेल्या उत्पादनातून आंब्यासाठी लागणार्या कीटकनाशकांची देयके, मजुरीचे पैसे, तसेच बँकेची कर्जपरतफेड आम्ही करू शकणार नाहीत. येथील आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला असून शासनाने बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी समस्त आंबा बागायतदारांच्या वतीने करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून त्यांच्यासमोर बागायतदारांच्या व्यथा मांडणार आहोत, अशी माहिती पावस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी दिली. या वेळी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत उपस्थित होते.
प्रकाश साळवी पुढे म्हणाले,
१. जिल्ह्यात आलेल्या वादळांनंतर जिल्ह्याच्या आंबा उत्पादनात दिवसेंदिवस घटच होत आहे. यावर्षी तर आंबा उत्पादन खूपच अल्प असल्यामुळे शासनाने आंबा बागायतदारांसाठी साहाय्य करणे आवश्यक आहे. अन्यथा आंबा बागायदार पुढील वर्षीच्या हंगामासाठी उभा राहू शकणार नाही.
२. वर्ष २०१५ मध्ये शासनाने कर्ज पुर्नगठण करून व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप ती रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झालेली नाही.
३. यावर्षी तर पीक कर्ज परतफेड कशी करावी ? असा बागायदारांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
४. मुख्यमंत्री शिंदे यांनी बागायतदारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे.