सनातनचा बालसाधक कु. पियूष लोखंडे याला इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत सुयश ! गणित विषयात १०० पैकी १०० गुण !

पुणे, २२ मे (वार्ता.) – येथील सनातनचा साधक कु. पियूष मकरंद लोखंडे याने इयत्ता १० वीच्‍या ‘सी.बी.एस्.सी.’च्‍या परीक्षेत ९७.६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. येथील साधना सत्संगातील जिज्ञासू सौ. प्रीती लोखंडे यांचा कु. पियूष हा मुलगा आहे. चिंचवड येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल स्कूल’मध्ये तो शिक्षण घेत आहे. विशेष म्‍हणजे कु. पियूष याला गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे.

कु. पियूषच्या यशाविषयी बोलतांना सौ. प्रीती लोखंडे म्हणाल्या, ‘‘पियूषला अभ्यासाच्या व्यतिरिक्त अध्यात्माची पण रुची आहे. तो प्रतिदिन ६ घंटे अध्ययन करायचा. त्याचसह तो गणपति अथर्वशीर्ष, संकटनाशक स्तोत्र, श्रीरामरक्षा स्तोत्र हेही प्रतिदिन म्हणतो. सकारात्मक राहून गणपतीला प्रार्थना करून पियूष पेपर लिहिण्यास आरंभ करत असे. परमपूज्य गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांना केलेल्या प्रार्थनांमुळे पियूषला बळ मिळाले आणि तो उत्तम प्रकारे पेपर लिहू शकला. गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच हे सर्व घडले. त्याविषयी परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी कितीही कृतज्ञता सुमने वाहिली तरी ती अल्पच आहेत. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी परीक्षार्थींना संकष्टनाशकस्तोत्राची २१ आवर्तने केल्यामुळे होणारे लाभ सांगितले होते. ते सौ. प्रीति लोखंडे यांनी पियूषला सांगितले आणि पियूषने सलग दीड मास ती कृती केली. अगदी परीक्षेच्या दिवशीही पियूष आवर्तन करून मगच परीक्षेला जात असे. त्यामुळे त्याला परीक्षेत कधी ताण जाणवला नाही.’’