२१ ते २८ मे या कालावधीत महाराष्ट्रात आयोजित केलेल्या ‘वीर सावरकर गौरव यात्रे’च्या निमित्ताने…

…म्हणूनच आपल्या देशाला ‘हिंदुस्थान’ हे नाव चालू राहिले पाहिजे ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

मूळ सिंध शब्दापासून उत्पन्न झालेले ‘इंडिया’ किंवा ‘हिंद’ असे शब्द वापरण्यास प्रत्यवाय नाही; पण तेही ‘हिंदूंचा देश’, ‘हिंदु राष्ट्राचे वसतीस्थान’ याच अर्थाने वापरता येतील. आर्यावर्त, भारतभूमी इत्यादी आपल्या मायभूमीची आपणास प्रिय असलेली प्राचीन नावे, अर्थातच सुसंस्कृत लोकांना प्रिय रहातील. आमच्या मायभूमीला ‘हिंदुस्थान’ याच नावाने संबोधले पाहिजे. हा आग्रह धरण्यात अहिंदु अशा आमच्या देशबंधूंवर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण वा मानहानी करण्याचा आमचा उद्देश नाही. आपले पारशी नि ख्रिस्ती देशबंधू हे आजच आमच्याशी सांस्कृतिकदृष्ट्या इतके समानशील आहेत, इतके स्वदेशभक्त आहेत आणि अँग्लो इंडियन इतके समंजस आहेत की, ते या हिंदूंच्या न्याय्य भूमिकेशी मिळते घेण्याचे मुळीच नाकारणार नाहीत.

१. अन्य देशांप्रमाणे देशातील मुसलमानांनी ‘हिंदुस्थानी मुसलमान’ या नावात समाधान मानावे !

आपल्या मुसलमान देशबांधवासंबंधी बोलायचे, तर ‘हिंदुस्थान’ या नावाची हिंदु-मुसलमान ऐक्याच्या मार्गात दुर्लघ्य पर्वतासारखी अडचण आहे’, असे मानणारे त्यांच्यात कित्येक आहेत. ही वस्तूस्थिती लपवण्यात अर्थ नाही; पण त्यांनी हे ध्यानात आणावे की, मुसलमान हे काही एकट्या हिंदुस्थानातच आहेत, असे नाही किंवा मुसलमानी जगतात काही हिंदी मुसलमानच केवळ निष्ठावान मुसलमान अवशिष्ठ राहिलेले नाहीत.

चीनमध्ये कोट्यावधी मुसलमान आहेत. तसेच ग्रीस, पॅलेस्टाईन आणि हंगेरी नि पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्र घटकात सहस्त्रावधी मुसलमान समाविष्ट आहेत; पण तेथे ते अल्पसंख्य असल्याने केवळ ‘एक जात’ म्हणून नांदत आहेत आणि या देशांना त्यातील मोठ्या बहुसंख्येने असलेल्या वंशांची वसतीस्थाने म्हणून रूढ झालेली; प्राचीन नावे काढण्यासाठी तेथे कुणी या अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करत वा आणत नाही. पोल लोकांच्या देशाचे नाव ‘पोलंड’ नि ग्रीकांच्या देशाचे नाव ‘ग्रीस’ हेच चालू आहे. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत किंवा करण्यात धजले नाहीत, तर उलट तसा प्रसंग येताच पोलीस मुसलमान, ग्रीक मुसलमान किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधले जाण्यात ते समाधान मानतात, तसेच आपल्या मुसलमान देशबांधवांनी राष्ट्रीय नि प्रादेशिक दृष्ट्या आपला निर्देश करण्याच्या वेळी ‘हिंदुस्थानी मुसलमान’ या नावात समाधान मानावे. असे करण्यात त्यांच्याच धार्मिक नि सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वाला मुळीच बाधा येत नाही.

२. हिंदूंचा देश ‘हिंदुस्थान’ या नावानेच जगाच्या नकाशामध्ये नाव कोरावे !

येथील मुसलमान हिंदुस्थानात आल्यापासून आपणांस ‘हिंदुस्थानी’ असेच म्हणत आले आहेत; पण या सर्व गोष्टी न मानता, आपल्या देशबांधवातील काही दुरान्वयी मुसलमान गट आपल्या या देशाच्या नावालाच बाधा आणतात. एवढ्या वरूनच आपणही आपला विवेक सोडून आत्मप्रत्ययहिन बनण्याचे कारण नाही. ‘हिंदुस्थान’ या सर्वत्र रूढ झालेल्या आपल्या मायभूमीच्या नावाने, ऋग्वेदकालातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदु शब्दापर्यंत जी राष्ट्रीय परंपरा व्यक्त होते, ती विच्छेदण्यास वा तिच्याशी प्रतारणा करण्यास हिंदूंनी सिद्ध होऊ नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्तान नि अफगाणांचा अफगाणिस्थान. त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून ‘हिंदुस्थान’ या नावानेच आपण आपले स्थान जगाच्या आलेखात (नकाशात) चिरंतन खोदून ठेवले पाहिजे.

– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

(साभार : ‘समग्र सावरकर वाङ्मय’ पुस्तक, खंड ७)