टी. राजा सिंह यांचे भाजपमधून झालेले निलंबन रहित होण्याची शक्यता !

केंद्रीय मंत्री किशन रेड्डी व प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – भाजपमधून निलंबित करण्यात आलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचे निलंबन रहित करण्याचे सुतोवाच केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी केले आहे. याविषयी टी. राजा सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे.

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ऑगस्ट २०२२ मध्ये टी. राजा सिंह यांना भाजपने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते.

१. वृत्तवाहिनी ए.बी.एन्.ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना राजा सिंह यांच्या निलंबिनाविषयी प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावर रेड्डी म्हणाले की, राजा सिंह यांना नियमांच्या अंतर्गत निलंबित करण्यात आले होते. ते निलंबन १०० टक्के मागे घेण्यात येईल. या संदर्भातील निर्णय केंद्रीय पदाधिकारी घेतील. याविषयी मीसुद्धा चर्चा करत आहे. केंद्रीय पदाधिकार्‍यांना सर्व माहिती देत आहे. लवकरच याविषयीचे गूढ संपेल.

२. याविषयी टी. राजा सिंह म्हणाले की, मी रेड्डी यांच्या विधानाचे स्वागत करतो. मी निलंबित झाल्यानंतरही भाजपसाठीच काम करत होतो. निलंबन रहित झाल्यावर आणखी मोठ्या प्रमाणात काम करेन.