संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार्‍याचे काश्मीरसंदर्भातील आरोप खोटे ! – भारताची स्पष्टोक्ती

भारताने काश्मीरमध्ये जी-२० ची बैठक आयोजित केल्याचे प्रकरण

फर्नांड डी व्हर्नेस

जिनिव्हा (स्वित्झर्लंड)/नवी देहली – काश्मीरमध्ये होणार्‍या जी-२० बैठकीसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्‍याने केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे अल्पसंख्यांक व्यवहार प्रतिनिधी फर्नांड डी व्हर्नेस यांनी जम्मू-काश्मीर आणि तेथील अल्पसंख्यांकांच्या प्रश्‍नांवर एक निवेदन प्रसारित केले होते. त्यात त्यांनी भारतावर बळाचा अवाजवी वापर करून अल्पसंख्यांकांना दडपल्याचा आरोप केला होता, तसेच खोर्‍यातील अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नाविषयी चिंता व्यक्त केली होती. (व्हर्नेस  कधी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्यांवर भाष्य करतात का ? कि तेथील हिंदूंना मानवाधिकार नाहीत ? – संपादक) यावर भारताने म्हटले की, फर्नांड डी व्हर्नेस यांचे आरोप निराधार आणि खोटे आहेत. भारत त्यांचे खंडन करतो. जी-२० चा अध्यक्ष या नात्याने भारताला देशाच्या कोणत्याही भागात या शिखर परिषदेच्या बैठका आयोजित करण्याचा अधिकार आहे.

संयुक्त राष्ट्रांतील भारतीय अधिकार्‍यांनी भारताची भूमिका स्पष्ट करतांना पुढे म्हटले की, फर्नांड यांचे वक्तव्य अत्यंत दायित्वशून्यतेचे आहे. ते जम्मू-काश्मीरच्या सूत्रावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जे काही सांगितले, ते खरेतर पूर्वग्रहदूषितपणाचा परिणाम आहे आणि ते संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी म्हणून चुकीचे कृत्य आहे.