लांजावासियांची प्रशासनाला चेतावणी !
लांजा – अमली पदार्थाची विक्री आणि सेवन यामुळे भावी तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. येत्या १५ दिवसांत लांजा शहरात अवैधपणे होणारी अमली पदार्थ विक्री आणि सेवन या विरोधात तातडीने पावले उचलावीत, अन्यथा येथील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, अशी चेतावणी एका निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आली. हे निवेदन लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे आणि नायब तहसीलदार सौ. उज्ज्वला केळुसकर यांना देण्यात आले. या वेळी प्रकाश लांजेकर, विकास शेट्ये, नाना शेट्ये, विठोबा लांजेकर, विजय कुरूप, नंदराज कुरुप, संजय यादव आणि अन्य नागरिक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची राजरोसपणे विक्री होत आहे; मात्र अशा प्रकाराला पायबंद घालण्याऐवजी पोलिसांकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. भावी पिढी मोठ्या प्रमाणात या अमली पदार्थाच्या सेवनामुळे उद्ध्वस्त होत असल्याने आम्ही नागरिक हे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.
हे निवेदन दिल्यानंतर ‘ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणा’ या दोघांच्या सहकार्याने आपण ही कीड नष्ट करूया’, असे ठोस आश्वासन या वेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांनी दिले.
संपादकीय भूमिकाप्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी ! |