कर्नाटकात आम्ही हरलो, तरी आमचा निवडून येण्याचा ‘रेट’ चांगला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर – इतर राज्यांत निवडून येण्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास हे आहे. स्थानिक ठिकाणी अशा अडचणी सिद्ध होतात. त्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते. कर्नाटकात आम्ही हरलो, तरी आमचा निवडून येण्याचा ‘रेट’ (वारंवारता) चांगला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

ते पुढे म्हणाले की, कर्नाटकात वर्ष १९८५ पासून कुठलेच सरकार पुन्हा सत्तेवर आले नाही. या वेळी ‘आम्ही तो ‘ट्रेंड’ मोडू’, असा आम्हाला विश्वास होता; मात्र ते शक्य झाले नाही. वर्ष २०१८ मध्ये आम्हाला ३६ टक्के मते मिळाली होती. या वेळी आम्हाला ३५.६ टक्के मते मिळाली आहेत. आमची केवळ अर्धा टक्के मते अल्प झाली; मात्र आमच्या जवळपास ४० जागा अल्प आल्या आहेत. वर्ष २०१८ मध्ये जे.डी.एस्. पक्षाला १८ टक्के मते मिळाली होती. या वेळी त्यांची जवळपास ५ टक्के मते अल्प झाली. ही मते काँग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसला हा विजय मिळाला असून भाजपची मते कुठेही अल्प झालेली नाहीत.

‘भाजपला जिंकायचे असते, त्या ठिकाणी ‘ई.व्ही.एम्’ यंत्र पालटले जाते. त्यामुळे भाजपला तिथे बहुमत मिळते’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, यापेक्षा मोठा मूर्खपणा काय असू शकतो ? असे आहे, तर कर्नाटकातील निवडणुकीत मग भाजपने हे का नाही केले ? काही लोकांना मूर्खासारखे बोलायची सवय झाली आहे. आमच्या पराभवाचे विश्लेषण आम्ही करू. ते करण्यासाठी आम्हाला दुसरा कुणी नको.