सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म झाला, त्या खोलीत रामनाथी आश्रमाएवढे चैतन्य आहे ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाही वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अन्य एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही नागोठणे येथे आल्या होत्या. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म झाला, त्या खोलीत सनातनच्या ‘रामनाथी आश्रमाएवढे चैतन्य आहे’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी म्हटले होते. ‘ही वास्तू श्री. नाना वर्तक यांनी सांभाळल्यामुळे त्यांच्याविषयी सतत कृतज्ञता वाटली पाहिजे’, असेही त्या म्हणाल्या होत्या. – सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३) |
१. नागोठणे येथील घरी जाण्याविषयी ओढ वाटणे
नागोठणे येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म झालेल्या घरात सून म्हणून जाण्याचे महत् भाग्य मला लाभले. विवाहानंतर पहिली दहा वर्षे तिथे अधिक वेळा जाण्याचा योग आला नाही; पण जेव्हा जेव्हा जाण्याचा प्रसंग येई, तेव्हा ‘तिथे जाण्याची एक ओढ वाटत असे’ असे आता लक्षात येते. ‘ती ओढ तेथील सात्त्विक वातावरणामुळे होती’, असे वाटते. प्रत्यक्षात येथे शहरातील घराप्रमाणे आधुनिक सुविधा नसूनही ‘नागोठणे येथे यायला नको’, असे कधी वाटले नाही. यामागेही या वास्तूतील चैतन्यच कारणीभूत आहे !
२. कितीही कष्ट केले, तरी शारीरिक त्रास न होणे
वर्ष २०१४ नंतर वर्षातून ३-४ वेळा ३-४ दिवसांकरता या पवित्र वास्तूत रहाण्याचे आणि तिला अनुभवण्याचे भाग्य लाभले. गेल्या २ वर्षांत वेगवेगळ्या कारणांनी अनेक दिवस येथे वास्तव्य करता आले. ‘येथे दिवसभर कितीही कष्ट केले, तरी शारीरिक त्रास होत नाही’, हे मी नेहमी अनुभवते. येथे ‘कधी आजारी पडले’, तरी अतिशय अल्प कालावधीत प्रकृती सुधारते.
३. वास्तूतील जिवंतपणा आणि चैतन्याची अनुभूती !
या वास्तूत एक प्रकारचा जिवंतपणा आहे. ‘येथील कणाकणात पुष्कळ चैतन्य ठासून भरले आहे’, असे अनुभवता येते. येथे काही वेळा आनंदाची स्पंदनेही जाणवतात आणि त्यामुळे प्रसन्न वाटते.
४. फुलांनीही जाणले जन्मस्थानाचे चैतन्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाच्या खोलीतील छायाचित्राला वाहिलेले फूल दुसर्या दिवशी सकाळपर्यंत ताजे दिसते. ‘जणू काही आताच वाहिले आहे’, एवढे ते ताजे असते ! ही अनुभूतीही मी अनेक वर्षे घेत आले आहे.
५. वास्तूतील चैतन्यामुळे स्वयंपाकाला येते अवीट गोडी !
‘या वास्तूत केलेल्या स्वयंपाकालाही अवीट गोडी आहे’, असे बर्याचदा जाणवते. अनेकदा साधक, नातेवाईक पदार्थ पुष्कळ चांगला झाल्याचे सांगतात. ‘याचेही कारण येथील चैतन्यातच दडलेले आहे’, हे प्रकर्षाने लक्षात येते.
हे भगवंता, ‘या वास्तूचा आध्यात्मिक लाभ करून घेण्यासाठी मी नेहमी अल्प पडते. येथील चैतन्यात डुंबता येण्यासाठी तूच माझ्याकडून भावाच्या स्तरावरील प्रयत्न सातत्याने करून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३)
जन्मस्थानाच्या परसबागेची वैशिष्ट्ये !
या वास्तूच्या परिसरातील बाग म्हणजे चैतन्याची खाणच आहे. या वास्तूच्या भोवताली असलेल्या परिसरात माझे सासरे श्री. विजय (नाना) वर्तक (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मामेभाऊ) यांनी बरीच झाडे लावली होती आणि त्यांपैकी काही झाडे आताही आहेत. अन्य ठिकाणची झाडे आणि जन्मस्थानाच्या परसबागेतील झाडे यांच्यामधील भेद उघड्या डोळ्यांनीही लगेच लक्षात येतो. नाना अतिशय प्रेमाने या झाडांचा सांभाळ करत. ते दिवसभर या बागेमध्ये नामजप करत सेवा करत.
१. बाहेरच्या काही झाडांची फुले, पाने छोट्या आकाराची, कृश किंवा फिकट रंगाची असतात. ‘जन्मस्थानीच्या परसबागेत त्याच जातीच्या झाडांची फुले, पाने अतिशय टवटवीत, अधिक सुंदर, अधिक तेजस्वी आणि अधिक मोठ्या आकाराची असतात’, हे मी अनेक वर्षे सातत्याने अनुभवत आले आहे.
२. येथील शोभेच्या झाडांकडे पाहूनही चांगले वाटते. इतर ठिकाणच्या तुलनेत जन्मस्थानाच्या परसबागेत नवीन झाडे उगवणे आणि ती टिकून रहाणे, याचे प्रमाणही अधिक आहे.
३. येथील सर्वच झाडे बाहेरच्या तुलनेत अधिक सशक्त वाटतात.’
– सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थळाच्या वास्तूविषयी समाजातील व्यक्तींना वाटणारी आपुलकी !
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आल्या असतांना पूर्वी नानांकडे नियमित येणारे आणि त्यांची आपुलकीने काळजी घेणारे गावातील काही जणही आले होते. (नानांकडे गावातील लोकांचा नियमित राबता असल्याने आम्हीही (मी आणि माझे पती) निर्धास्त असायचो.) त्यांपैकी एक श्री. राजा सोष्टे यांच्याकडे काही बांधकाम व्यावसायिक नेहमी जन्मस्थळाच्या जागेविषयी चौकशी करत; परंतु हा विषय नानांपर्यंत अधिक येऊ न देता ते परस्पर व्यावसायिकांना सांगत, ‘‘ही वास्तू बांधकाम व्यावसायिकांना द्यायची नाही. येथे पुढे आश्रम होणार आहे.’’
हा प्रसंग श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘या सर्वांनी नानांना सांभाळले आणि नानांनी वास्तूला सांभाळले !’’ नानांचे निधन होऊन ५ मास झाले, तरी अजूनही श्री. सोष्टे हे प्रतिदिन संध्याकाळी वास्तूचे दर्शन घेण्यासाठी येतात.’
– सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३)
वाढदिवस असलेल्या दिवशीच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग लाभला !‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या नागोठणे येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानी येणार हा निरोप मला सकाळी अनपेक्षित मिळाला. त्या दिवशीच माझा वाढदिवस असल्याने माझ्यासाठी तो मोठा भाग्याचा दिवस ठरला ! त्या दिवशी गुरुवार होता. एरव्ही गुरुवारी भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकून सर्व साधक भक्तीसागरात न्हाऊन निघतात ! याच सत्संगाच्या वेळेत आम्ही काही साधक पनवेल ते नागोठणे असा २ घंट्यांचा प्रवास श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासमवेत करून नागोठणे येथे पोचलो. माझ्या जन्मदिनाच्या दिवशी खर्या अर्थाने सगुणातून मला ‘भक्तीसत्संगा’चा लाभ झाला. हा माझ्यासाठी दुग्धशर्करायोगच ठरला !’ – सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |